लासलगाव : कांदा नगरी पडली ‘ओस’

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारच्या जाचक अटीमुळे देशातील शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना कांद्यामुळे रडण्याची वेळ आलेली आहे. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्याने सलग तिसऱ्या दिवशीही लासलगाव सह जिल्ह्यातील प्रमुख कांदा बाजार आवारावर लिलाव झालेले नाही मात्र लासलगाव बाजार समितीची उपसमिती असलेले विंचुर बाजार समितीमध्ये बुधवारी कांद्याचे लिलाव सुरू झाले. बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त ५८०० कमीत कमी १८०० व सरासरी भाव ४५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद असल्यानं तीन दिवसांत १० कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्याने कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांनी असमर्थता दर्शविली असल्याने लासलगाव बाजार समिती ओस पडलेली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या तीन दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद आहेत. त्यामुळे १० कोटींहून अधिकची उलाढाल ठप्प झाली आहे, ही अघोषित कांदा लिलाव बंदी जास्त दिवस राहिल्यास कांदा उत्पादकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर केंद्राने लवकरात लवकर तोडगा काढावा आणि लिलाव पूर्वरत सुरू करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे