Lasalgaon News : बेमोसमी पावसाने द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकरी हतबल

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  –  लासलगाव (Lasalgaon)  व परिसरात शुक्रवारी (ता. ८)रात्री झालेल्या अवकाळी पावसाने परिसराला चांगलेच झोडपले. यात द्राक्ष, कांदा गहू, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. निफाड तालुक्यातील द्राक्ष आणि कांदा याला मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या मोठ्या संकटानंतर द्राक्ष आणि कांदा निर्यातीचा हंगाम सुरू झालेला असताना गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

निफाड तालुक्यात आर्ली छाटलेल्या द्राक्षबागामध्ये पाणी उतरून पूर्ण साखर आलेली आहे. या द्राक्षबागा विकण्यासाठी पूर्ण तयार झाल्या असून, पावसामुळे द्राक्षमण्यांना तडे जात आहे. दुसरीकडे ज्या द्राक्षबागेतील घड पेपरने झाकलेले आहे, आशा घडांमध्ये पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे पेपर जास्त प्रमाणात ओला झाल्याने द्राक्ष मण्यावर काळे डाग पडलेले आहे. कोरोनामुळे मागील हंगामात द्राक्ष बागायतदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतक-यांना भांडवलदेखील तयार करता आलेले नाही. शेतक-यांनी द्राक्ष फेकून दिलेले असून पुन्हा चालू वर्षी अवकाळीने फटका बसत असल्याने मोठे आव्हान ठरले आहे.

शुक्रवारी रात्री पाऊस झाला. त्यामुळे दिवसभर शेतकरी द्राक्षशेतीत बुरशीजन्य औषधांची फवारणी करत होते. पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मोठ्या प्रमाणात मणीगळ व घडकुज होऊन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. काही शेतकऱ्यांनी घडांना कागद लावले आहेत, तेही पावसामुळे ओले झाले आहेत.

लासलगाव जवळील ब्राम्हणगांव विंचूर येथील शेतकरी राजाराम लक्ष्मण गायकवाड यांच्या १ एकर द्राक्षे बागेतील घडांना ६० ते ७० % क्रॅकिंग गेली आहे अजून दोन दिवसांनी व्यवहार करायचा होता.मात्र या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे तर विंचूर येथील महेश गोरख जाधव यांच्या सुद्धा द्राक्षे बागेतील घडांना क्रॅकिंग गेले आहे . या पावसाने शेतकऱ्यांचा औषधांची फवारणी करण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या द्राक्ष शेतीची कामे शेवटच्या टप्प्यात आली असताना निसर्ग ही सध्या साथ देत नसल्याने द्राक्षशेती सध्या अडचणीची ठरत आहे