लासलगांव : कांद्याच्या दरात 550 रुपयांची घसरण

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा कांदा दरामध्ये तब्बल ५५० रुपयांची घसरण दिसून आली. आज लाल कांद्याला सरासरी 3650 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून दररोज होत असलेल्या कांदा दराच्या घसरणीमुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

आयात केलेला कांदा आणि आपल्याकडील लाल कांदा एकाच वेळेस बाजार समितीमध्ये विक्रीस येत असल्याने दररोज शेअर बाजाराप्रमाणे कांद्याच्या भावामध्ये पडझड होताना दिसत आहे. लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य शहरांमध्ये दररोज साधारणत 20 ते 21 हजार क्विंटल कांद्याची आवक असून जिल्ह्याचा विचार केला तर दररोज दोन लाख क्विंटल कांदा हा विक्रीसाठी बाजारात दाखल होत आहे. मागणीच्या तुलनेमध्ये मुबलक पुरवठा होत असल्याने कांदा दरामध्ये घसरण होत आहे.

नोव्हेबर आणि डिसेंबरच्या उच्चांकानंतर कांदा भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसत आहे. येथील बाजार समितीत 17 डिसेंबर रोजी लाल कांद्याला ऐतिहासिक 11111 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्यानंतर कांद्याच्या बाजारभावात दररोज टप्प्याटप्प्याने घसरण होत कांदा 3650 रुपये दराने विक्री होत आहे. 17 डिसेंबरच्या तुलनेमध्ये लाल कांद्याच्या दरामध्ये 67 टक्के घसरण दिसून आली आहे. सप्टेंबर महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने देशांतर्गत कांदा भावाने हाहाकार उडविला होता. डिसेंबरअखेर पासून नवीन कांदा बाजारांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध झाल्याने काही प्रमाणात का होईना कांदा दरामध्ये घसरण झाली आहे.

आज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 1659 वाहनातून लाल कांद्याची आवक होऊन त्याला कमीत कमी 1200 जास्तीत जास्त 4650 तर सरासरी 3651 रुपये भाव मिळाला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/