Lasalgaon : ‘कोरोना’च्या धास्तीमुळं कांद्याच्या दरात 750 रूपयांची घसरण

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  –   दिवाळी नंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना दुसरी लाट नव्हे तर सुनामी येण्याची शक्यता वर्तवल्यानंतर एका खाजगी वृत्तवाहिनीत जिल्ह्यात संचार बंदी लागू होणार या खोडसाळ पनाणे सोशल मीडियात व्हायरल केल्याने कांदा मागणीत घट होत कांद्याच्या बाजारभावात घसरण होण्याच्या भीतीमुळे लासलगाव सह जिल्ह्यातील कांद्याच्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याने आज लासलगाव येथे कांद्याच्या सर्वसाधारण भावात ७५० रुपयाची घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे

आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून लासलगाव बाजारसमितीकडे बघितले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा येथील कांद्याच्या भावाकडे लागून राहतात. आज झालेली ७५० रुपयांची घसरण शेतकऱ्यांसाठी निराशाजनक राहिली.आज येथील मुख्य कांदा बाजार आवारावर १५४५५ क्विंटल कांद्याची विक्री झाली.

येथील मुख्य बाजार आवारात शनिवारी उन्हाळ कांद्याचे किमान दर १७०० रुपये होते तर कमाल ४७०० रुपये होते. सरासरी ४१५० रुपये प्रतीक्विंटल दराने कांद्याची विक्री झाली. हाच दर सोमवारी किमान १२०० तर कमाल ४४०० रुपये तर सरासरी ३४०० राहिला यामध्ये शनिवारच्या तुलनेत आज ७५० रुपयांची घसरण झाली.

या तुलनेत लाल कांद्याला शनिवारी किमान २६०० ते कमाल ५००१ दराने विक्री झाला होता. तर सरासरी या कांद्याचा दर ४१०० रुपये इतका राहिला होता. हाच कांदा आज सोमवारी किमान ९५१ रुपये तर कमाल ५०८० रुपये दराने विक्री झाला. सरासरी कांदा ३८०० रुपयांनी विक्री झालेला बघायला मिळाला. त्यामुळे लाल कांद्यातही आज ३०० रुपयांची घसरण झाली.

भारत दिघोळे, अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना

देशात कांद्याला अतिशय चांगली मागणी आहे लाल कांद्याची पूर्णक्षमतेने आवक वाढण्यासाठी अजून 1 महिन्याचा अवधी लागणार आहे आपल्याकडे असलेला कांदा टप्प्याटप्प्याने आनावा जेणेकरून शेतमालाला समाधानकारक भाव मिळेल असे आव्हान महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केले आहे

भाव घसरल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधीचा फटका

अचानक कांद्याची मोठी आवक झाल्याने सर्वसाधारण दरात सातशे पन्नास रुपयांची घसरण जरी दिसत असेल तरी मात्र हजारो क्विंटल कांद्याची विक्री झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला.