Lasalgaon : कांदा घसरणीचे शुक्लकाष्ठ थांबता थांबेना

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –   राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये नवीन कांद्याची आवक वाढल्याने कांदा घसरणीचे शुक्लकाष्ठ थांबत नसल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. दिवाळीपूर्वी साडेसहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे विक्री झालेला कांदा साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. पुन्हा लॉकडाउन होण्याच्या चर्चेची धास्ती घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला कांदा बाजार समितीत विक्रीस आणल्याने दररोज कांदा दरात घसरण होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दि. २६ रोजी लाल कांदा दर ८०० रुपयांनी, तर उन्हाळ ४५० रुपये क्विंटलने घसरले, तर दुसरीकडे भाववाढीची शक्यता लक्षात घेऊन निर्यातीपासून साठवणुकीपर्यंत विविध निर्बंध केंद्र सरकारने लागू केले.

कांद्याची भाववाढ कायम राहील, या आशेवर साठवून ठेवलेला आणि नव्याने पिकविलेला कांदा कमी भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पुन्हा लॉकडाउन होण्याच्या चर्चेची धास्ती घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केल्याने २५ दिवसांत भावात तीन हजारांनी घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

येथील मुख्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी ११०० सरासरी ३००० जास्तीत जास्त ३५१२ भाव मिळाला, तर लाल कांद्याला कमीत कमी २५०० सरासरी ३२४० जास्तीत जास्त ४५०० भाव मिळाला.