लासलगाव : ऐन थंडीत पपईच्या दराला भरली ‘हुडहुडी’

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  सध्या जम्मू-काश्मीर, लडाख व हिमाचल प्रदेश या राज्यात बर्फदृष्टी होत असल्याने थंडीने कहर केला आहे. त्यामुळे उत्तर भारतात पपईला मागणी वाढली आहे. या भागातील बाजारपेठेत पपईला प्रतिकिलो 30 ते 40 रुपये इतक्या दराने विक्री होत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्याकडून व्यापारी पाच ते सात रुपये किलो दराने पपई खरेदी करत असल्याने आजपर्यंत झालेला खर्चही भरून निघणे मुश्कील झाल्याने शासनाने पपई उत्पादकांकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी दीपक श्रीवास्तव यांनी केली आहे.

निफाड तालुक्यातील दीपक श्रीवास्तव या शेतकऱ्याने कांदा, ऊस आणि द्राक्षे या पारंपरिक पिकाला फाटा देत काहीतरी वेगळे करण्याचे मनात घेतले आणि पपई हे पीक सर्वांत लाभदायक असल्याचे दिसून आल्याने आपल्या दोन एकर जमिनीवर पपईची लागवड करण्याचा निर्णय घेतला. तैवान ७८६ या जातीच्या १८०० झाडांची लागवड केली. त्यासाठी जमिनीची उत्तम मशागत करून ठिबक संच बसवले. मल्चिंग पेपरच्या साह्याने संपूर्ण आधुनिक पद्धतीने पपई लागवडीचे नियोजन केले.

साधारणपणे आठ ते नऊ महिन्यांमध्ये पपईचे उत्पन्न मिळू लागते. रोपे, मजुरी, खते, मल्चिंग पेपर, वाहतूक अशा सर्व गोष्टी मिळून आजपर्यंत तीन लाख रुपये इतका खर्च आला आहे. हवामान, उत्पादन, किंमत अशा सर्व गोष्टी अनुकूल ठरल्या तर साधारणपणे दहा लाख रुपये उत्पन्न मिळेल, असा हिशेब होता; परंतु यंदा निसर्गाने जबरदस्त तडाखा दिल्याने झालेला खर्चदेखील भरून निघेल की नाही, अशी भीती आहे. एप्रिल व मे महिन्यांतील भाजून काढणारा कडक उन्हाळा आणि पूर्ण पावसाळाभर अतिवृष्टी व ढगाळ हवामानामुळे पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने व अति पाण्यामुळे झाडांची म्हणावी तशी वाढ झाली नाही. खराब हवामानामुळे व्हायरस आणि बुरशीजन्य रोगांचाही प्रादुर्भाव झाला. त्यामुळे फळांची संख्या कमी पडली आहे. त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणजे किरकोळ बाजारात पपईला चांगली मागणी व भाव असूनदेखील घाऊक व्यापारी मात्र शेतकऱ्यांच्या पदरात भाव पडू देत नाहीत. त्यामुळे सोन्यासारखा माल मातीमोल दराने द्यायची वेळ आली आहे.

ठिबक सिंचनासाठी तब्बल एक लाख वीस हजारांचा खर्च करून आता आठ महिने होत आलेत, परंतु अद्याप शासकीय अनुदानाचा एक रुपयादेखील हाती आलेला नाही, अशी खंतदेखील श्रीवास्तव यांनी व्यक्त केली.

श्रीवास्तव यांनी पपईबरोबरच बारमाही पेरू, शेवगा, टरबूज, झेंडू, आंबा यांचीदेखील आपल्या शेतात लागवड करून बहुपीक पद्धतीचा अवलंब करून शेती उद्योग फायदेशीर होण्यासाठी धडपड चालवली आहे.