लासलगाव : कांदा भावात वाढ मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – येथील मुख्य बाजार समितीत लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून दररोज साधारण वीस ते बावीस हजार क्विंटलची आवक घाऊक बाजारात होतांना दिसत आहे. शनिवार ३१ जानेवारीला लाल कांदा सरासरी २९०० रुपये प्रति क्विंटलने विक्री झाला होता आज त्यात ५०० रुपये प्रति क्विंटलची वाढ होऊन कांद्याला सरासरी ३४०० रुपये दर मिळाला. कांद्याला चांगली मागणी असल्याने भाव जरी चढे दिसत असले मात्र कांदा लागवडीसाठी झालेला खर्च त्यात पेट्रोल आणि डिझेल भाव वाढीचा उडालेला भडका पाहून परवडत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहे.

सप्टेंबरमध्ये घाऊक बाजारात कांदा दरात वाढ होताच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी देखील सुरू झाली होती. यामुळे शेतकरी प्रचंड आक्रमक होऊन रस्त्यावर देखील उतरले होते. तर, विरोधी पक्षांनी देखील या निर्णयाचा निषेध केला होता.या नंतर १ जानेवारीपासून कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला मात्र कांदा निर्यातबंदी उठविली असली तरीही निर्यात अपेक्षेएवढी होत नसल्याने निर्यातबंदी उठवल्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. निर्यात बंदी बरोबर केंद्राने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करणे आवश्यक असून जेणेकरून जास्तीत जास्त कांदा हा देशाबाहेर जाण्यास मदत होईल अन देशाला परकीय चलन मिळेल.

येथील मुख्य बाजार समितीत १५०० वाहनांतून कांदा आवक होऊन कांद्याला कमीत कमी १४०० सरासरी ३४०० जास्तीत जास्त ३६१२ भाव मिळाले