लासलगाव शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची व वाहनचालकांची भर चौकात RT-PCR टेस्ट

लासलगाव : नाशिक जिल्ह्यात 12 मे ते 22 मे पर्यंत कडक जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे कोरोणा बाधित रुग्णांचा आकडा कुठेतरी कमी होत असताना अशा परिस्थितीत लासलगाव शहरात अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत अशा नागरिकांची व वाहनचालकांची रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्ट भर चौकात आरोग्य विभाग व लासलगाव पोलिसांच्या वतीने बुधवारी करण्यात आली.

नाशिक जिल्ह्यात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या आदेशान्वये अत्यंत कडक जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. फक्त अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत अशा परिस्थितीत अनेक वाहनचालक व नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरत आहेत त्यामुळे कुठेतरी स्थिर झालेला कोरोना बाधित रुग्ण संख्येचा आकडा वाढण्याची भीती आहे.

लासलगाव पोलीस कार्यालय व आरोग्य विभाग यांच्या वतीने लासलगाव येथील कोटमगाव रोड चौफुली येथे बुधवारी सकाळपासूनच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांची रॅपिड टेस्ट करण्यात येत होती. ज्या वाहनचालकांची टेस्ट निगेटिव्ह आली त्यांच्यावर लासलगाव पोलीस कार्यालयात संचार बंदी भंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येत होता व ज्या नागरिकांची टेस्ट पॉझिटिव्ह आली अशांना स्थानिक विलगीकरण केंद्र व कोविड केअर सेंटर मध्ये रवानगी करण्यात येत होती.

लासलगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ ,लासलगाव ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील तसेच पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते