SBI चे एटीएम फोडून 4.75 लाखांची रोकड ‘लंपास’

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील निफाड तालुक्यातील विंचूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे पावणेपाच लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना आज पहाटे साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली. वाढत्या चोरीमुळे लासलगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीतील गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लासलगांव पोलिस ठाण्याच्या हद्दित गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. घरफोडी बरोबर चोरट्यांनी आता एटीएम वर लक्ष केंद्रित केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

निफाड तालुक्यातील विंचूर येथे नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावर असलेल्या एका कॉम्प्लेक्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम असून ते पहाटे साडेसहा वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडले. त्यातील अंदाजे पावणेपाच लाख रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळताच नाशिक ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक निफाड उपविभागीय पोलिस उपाधीक्षक माधव पडिले यांनी घटनास्थळाची माहिती घेऊन तत्काळ तीन पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी तपासासाठी पाठवले असल्याची माहिती दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून लासलगाव पोलीस स्टेशन ह्द्दीतील गावांमध्ये मोटरसायकलींची चोरी, चैन स्केचिंग, आठवडे बाजारात मोबाईल आणि पाकीट मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत असताना आता चोरट्यांनी एटीएम फोडून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले.