सोशल डिस्टेन्सिंगचं पालन करत लासलगाव मध्ये श्रीसंत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त लासलगाव शहर नाभिक समाजाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवारी आयोजित करण्यात आला होता. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवत ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

शहरातील श्री संत सेना चाॅरीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षी इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला जातो यावर्षी विद्यानगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री संत सेना महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर देवगाव येथील मंडल अधिकारी चंद्रभान पंडीत, मनोहर वाघ, सुखदेव वाघ, पुंजाराम वाघ, गुलाबराव सुर्वे, उपस्थित होते.

शहर व परिसरातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व रोख रक्कमेचे पारितोषिकांचे वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल वाघ यांनी केले. श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने हिरापूर चांदवड येथील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. या कार्यक्रमास श्री संत सेना चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष अरविंद देसाई, लासलगाव नाभिक समाजाचे अध्यक्ष संदीप वाघ, उपाध्यक्ष अभिजित जगताप, महिला अध्यक्षा सौ. उषा मोटेगावकर, यांच्यासह लासलगाव व परिसरातील नाभिक समाज बांधव व महिला या कार्यक्रमास उपस्थित होते.