2 दिवसात लासलगाव ST आगाराला 800 रुपयांचे उत्पन्न तर डिझेलवर 14 हजार खर्च

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या साडेतीन महिन्यापासून जिल्हाबंदी असल्याने आपत्कालीन सेवा वगळता इतर सर्व सार्वजनिक वाहतुकसेवा ही बंद आहे जिल्हा अंतर्गत एसटी सेवेला परवानगी देण्यात आली मात्र एसटीकडे अजूनही प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे मंगळवार आणि बुधवार मिळून साधारणता ८०० किमी अंतर कापून लासलगाव आगाराला ८१९ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या काही दिवसांपासून लासलगाव आगाराकडून प्रवाशांना जास्तीत जास्त बस सेवेचा असे आव्हान करण्यात येत आहे मात्र दोन दिवसात डिझेलवर १४ हजार रुपये खर्च होऊन लासलगाव आगाराला ८१९ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

लासलगाव एसटी आगारकडून लासलगाव-चांदवड ,लासलगाव-मनमाड आणि लासलगाव-निफाड या मार्गावर एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या असून या मार्गावर दोन दिवसात दिवसभरात ४० प्रवाशांनी प्रवास केला यातून लासलगाव आगारला ८१९ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. लासलगाव आगार व्यवस्थापक समर्थ शेळके यांनी जास्तीजास्त प्रवाशांनी एसटी सेवेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे.

प्रवाशी वाहतुकीतून उत्पन्न थांबल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) शेतमाल वाहतूक सेवाही देण्यास सज्ज झाली असून मागील महिन्यात लासलगाव आगाराच्या माध्यमातून १० टन कांदा मालाड,मुंबई येथे रवाना करण्यात आला होता. उत्पन्न वाढीसाठी माल वाहतूकी सारखे पर्याय वापर केला जात आहे.प्रवाश्यांकरिता निफाड,सिन्नर,चांदवड,मनमाड या ठिकाणी फेऱ्या सुरू केल्या असून प्रवाश्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे.