शिलाई महिला कामगारांच्या संपावर सन्मानजनक तोडगा नाहीच, आंदोलन सुरूच

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – कांदा बारदान पिशवी शिलाईचे काम करणाऱ्या महिला कामगार, बारदान व्यापारी यांच्या कांदा पिशवी शिलाई दर वाढी संदर्भात कुठल्याही सन्मानजनक तोडगा न निघाल्याने आज आठव्या दिवशी कांदा पिशवी शिवणाऱ्या महिलांचे आंदोलन सुरू होते. येथील कांदा बारदान पिशवी शिलाईचे काम करणाऱ्या महिलांनी मजुरी दरात वाढ करून मिळावी या मागणीसाठी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाचे पार्श्वभुमीवर आज लासलगांव बाजार समितीत झालेल्या बैठकीत मजूरी दरवाढी संदर्भात दिपावलीनंतर निर्णय घेणे योग्य होईल अशी भुमिका येथील बारदान दुकानदारांनी घेतली.

लासलगांव शहरात बारदान पिशवी शिलाईचे काम करणाऱ्या महिलांनी शिलाई मजुरीत वाढ करून मिळावी या मागणीसाठी गेल्या 07 दिवसांपासुन काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे सदर प्रश्नी संबंधीत महिला व बारदान दुकानदार यांची संयुक्त बैठक आज बाजार समितीच्या लासलगांव मुख्य कार्यालयात सभापती सौ. सुवर्णा जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती.

सदर बैठकीत संबंधीत महिलांनी सभापती सौ. सुवर्णा जगताप यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. त्यानुसार सध्या या महिलांना 100 गोणी शिवण्यासाठी 50 रूपये मजूरी देण्यात येत आहे. परंतू वाढत्या महागाईमुळे ही मजुरी परवडत नसल्याने सदर मजुरीत वाढ करून शेकडा 80 रूपयेप्रमाणे मजुरी मिळावी अशी मागणी लासलगांव, पिंपळगांव न. व ब्राम्हणगांव विंचुर परीसरातील महिलांच्या वतीने उपस्थितांना करण्यात आली.

सदर बैठकीस पिशवी शिवणार संघटनेच्या प्रतिनिधी रिना पवार, सोनाली कर्डीले, चैताली विंचु, फर्जाना पटेल, भारती शेजवळ, रेणुका पोळ, सुजाता पगारे यांचेसह परीसरातील महिला उपस्थित होत्या. बारदान व्यापारी संघटनेतर्फे पुरूषोत्तम चोथाणी, जितेंद्र चोथाणी, मनोज शिंगी, सागर चोथाणी, प्रतिक चोथाणी यांचेसह इतर बारदान दुकानदार उपस्थित होते.

सदर प्रसंगी झालेल्या चर्चेत संबंधीत महिला कामगार व बारदान व्यापारी संघटनेत यापुर्वी झालेल्या चर्चेप्रमाणे सध्या असलेल्या पिशवी शिलाईच्या दराची मुदत ही डिसेंबर, 2020 अखेर संपणार असल्याने संबंधीत महिलांनी काम बंद आंदोलन न पुकारता पुर्ववत पिशवी शिलाईचे कामकाजास सुरूवात करावी. सध्या असलेल्या दराची मुदत संपल्यानंतर संबंधीत महिलांशी चर्चा करून सध्याचे दरात 5 रूपयांपर्यंत वाढ करणेबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सुचविण्यात आले.

यावेळी बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांचेसह जि. प. सदस्य डी. के. नाना जगताप, स्मिता कुलकर्णी, बापु लचके, अनिल सोनवणे आदी उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/