लासलगाव : बुधवारपर्यंत बंद राहणार कांदा व धान्याचा लिलाव

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  दिवाळी व साप्ताहिक सुट्टीनिमित्त बँक बंद राहणार असल्याने शेतीमालाची रक्कम अदा करण्यासाठी पैसा उपलब्ध होणार नाही. यामुळे लासलगाव बाजार समितीत कांदा व धान्याचा लिलाव गुरुवारपासून पुढील आठवड्यातील बुधवारपर्यंत बंद राहणार असल्याने बाजार समितीतील आवारामध्ये शुकशुकाट दिसत आहे. यामुळे कांदा व धान्याचे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. यातून बळीराजा सावरत असताना कांद्याच्या बाजारभावात सोमवारच्या तुलनेत बुधवारी 1351 रुपयांची सर्वसाधारण दरात प्रतिक्विंटल मागे लासलगाव बाजार समितीत दोन दिवसांत घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी दिवाळीच्या तोंडावर चिंताग्रस्त असताना गुरुवारपासून कांद्याचे व धान्याची लिलाव दिवाळी; साप्ताहिक सुट्टीनिमित्त पुढील आठवड्यातील बुधवारपर्यंत बंद राहणार आहे. यामुळे बाजार समिती आवारात जरी शुकशुकाट दिसत असेल, पण धान्य व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले धान्यातील पिवळे सोने मका वाळवण्यासाठी बाजार समितीच्या आवारात टाकण्यात आल्याने कांदा आवाराला सोनेरी पिवळा रंग जडल्याचे दिसत आहे.