लासलगाव : दुर्मिळ ‘गजरा’ साप आढळल्यानं प्रचंड खळबळ, बघ्यांची गर्दी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव शहरात कोटमगाव रोड परिसरात अति दुर्मिळ बिनविषारी गजरा सापाला पकडण्यात सर्पमित्र आसिफ पटेल यांना यश आले असून वन विभागाकडे या सापाची नोंद करण्यात आल्यानंतर त्याला मुक्त वातावरणात विंचुर एमआयडीसी परिसरात सोडून देण्यात आले आहे.

शहरातील कोटमगाव रोड येथील ज्ञानेश्वर पाटील यांच्या निवासस्थाना जवळच बिनविषारी मात्र अत्यंत दुर्मिळ असलेला गजरा साप आढळला होता. यानंतर शहरातील सर्पमित्र आसिफ पटेल यांना बोलावण्यात आले होते. भारतीय मृदू साप म्हणजे गजरा साप असल्याची पुष्टी सर्पमित्रांनी केली असून या बिनविषारी सापाची लांबी जवळपास २३ इंच इतकी असते. पाल, सरडे, लहान बेडूक हे मुख्य खाद्य गजरा सापाचे असून हा साप लाजाळू गटात मोडत असल्याने शक्यतो मानवी वस्तीकडे फिरकत नसल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.

सर्पमित्र आसिफ पटेल यांनी या दुर्मिळ गजरा सापाला पकडून येवला येथील वन विभागाच्या कार्यालयात नोंद करून विंचूर जवळील एमआयडीसी परिसरात मुक्त वातावरणात सोडून दिले आहे.