लासलगाव : अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कांद्यासह रब्बी पिकांना फटका

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव व परिसरात सोमवारी मध्यरात्री रात्री अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे व तीन दिवसांपासून तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे परिसरातील शेतकरी हबकला आहे. पुढचे काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांची धाकधूक आणखी वाढली आहे. रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे कांद्यासह काढणीला आलेल्या रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा व खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.कांद्याला सध्या बाजारात चांगली मागणी असल्याने शेतकरी कांदा जगवण्यासाठी मोठी धडपड करीत आहेत. ढगाळ हवामानामुळे दिवसाआड फवारणी करण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. ढगाळ हवामानाचा कांदा पिकासह इतर रब्बीच्या पिकांनाही मोठा फटका बसत आहे. कांदा शेतकऱ्यांचे नगदी पीक समजले जाते पण ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या बुडाला खोड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

कांदा जगविण्यासाठी महागडी कीटकनाशक, बुरशीनाशक व पोषक औषधांसाठी चार ते पाच हजार रुपयांचा खर्च वाढला आहे. सद्य:स्थितीत मिळत असलेल्या दरामुळे शेतकरी खर्चही करीत आहेत. जर दर कोसळले तर कर्जाच्या खाईत जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कांदा लागवडीपासून ते आतापर्यंत पंचवीस ते तीस हजार रुपयांचा खर्च झालेला आहे. त्यात अवकाळी पावसामुळे व बदलत्या हवामानामुळे औषध व रासायनिक खताचा खर्च वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. या ढगाळ हवामानाचा कांदा पिकासह इतर रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसत आहे.

प्रतिक्रिया
गत वर्षी अवकाळी पावसाने खरीप हंगामाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता आता रब्बी हंगामही या ढगाळ वातावरणाने धोक्यात आला आहे. तो वाया जातो की काय याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. कांद्यासह रब्बी पिकांना गुलाबी थंडीची नितांत आवश्‍यकता असतानाच गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामतील पिकांवर विविध रोगराईंचा प्रादुर्भाव झाला आहे.
सुनील गवळी ( कांदा उत्पादक शेतकरी, ब्राम्हणगाव(विं )