लासलगाव : स्वयंस्फूर्तीने आठवडाभर सलून व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय

लासलगाव  : पोलीसनामा ऑनलाइन –  लासलगाव विंचूर सह परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलेली असल्याने लासलगाव शहरातील सलून व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने संपूर्ण आठवडाभर सलून व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोमवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृहात समाजबांधवांची बैठक घेण्यात आली त्यात हा निर्णय झाला.

कोरोना बाधित संख्या अवघ्या जिल्ह्यात वाढत आहे . गेली तीन महिने सलून व्यवसाय पूर्णपणे ठप्प होता. राज्य सरकारने २८ जून पासून सलून व्यवसायाला परवानगी दिलेली आहे. मात्र सलून व्यवसाय करताना थेट संपर्क येत असल्याने मोठ्या प्रमाणात बाधित संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे लासलगाव नाभिक समाज बांधवांनी एकत्रित येत आपापले सर्व व्यवसाय संपूर्ण आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सलून व्यावसायिक कुणाच्याही घरी जाऊन आपली सेवा देणार नसल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले आहे.

पुढील आठवड्यापासून फक्त मंगळवार ते शुक्रवार सलून व्यवसाय सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरू राहणार आहेत. सलून व्यवसाय करताना व्यवसायिक संपूर्ण काळजी घेऊन एकदा वापर केलेली वस्तू दुबार वापर न करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आलेला आहे. याप्रसंगी नाभिक समाजाचे पदाधिकारी व श्री संत सेना चॅरीटेबल ट्रस्ट चे पदाधिकारी व सर्व सलून व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.