जम्मू-काश्मीर : हंदवाडामध्ये भारतीय सैन्याला मोठं यश ! ‘लष्कर’चा टॉप कमांडर ‘हैदर’चा खात्मा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याने मोठे यश संपादन केले आहे. काश्मीरमधील हंदवाडा येथील राजवार भागात सैन्य आणि अतिरेक्यांच्या चकमकीत दोन परदेशी दहशतवादी ठार झाले आहेत. या चकमकीत लष्कर कमांडर हैदरही मारला गेला आहे. मात्र, या कारवाईत दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच सैनिकही शहीद झाले आहेत. शहीद जवानांमध्ये एक कर्नल, एक मेजर, लष्कराचे दोन जवान आणि एक जम्मू-काश्मीर पोलिसांचे सब-इन्स्पेक्टर यांचा समावेश आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांचे आयजी विजय कुमार यांनी एका वृत्तसंस्थेस सांगितले की, हंदवाडा चकमकीत लष्कर कमांडर ‘हैदर’ ठार झाला आहे. ते म्हणाले की सुरक्षा दलाच्या पाच जवानांना लक्ष्य करणार्‍या हैदरला ठार केले गेले आहे. ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटलेली नाही.

वास्तविक, या भागावर घनदाट जंगल आहे, त्यामुळे येथे घुसखोरीच्या घटना होतच असतात. शुक्रवारी लष्कराला अशी माहिती मिळाली की येथील एका घरात दहशतवादी लपून बसले आहेत, त्यानंतर राजवार भागात शोध मोहीम सुरू केली गेली, यावेळी सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या कारवाईत 21 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मादेखील होते. दरम्यान शनिवारी सायंकाळीच त्यांचा संपर्क तुटला होता.

रविवारी सकाळी चकमकीच्या ठिकाणी शोध घेण्यात आला जेथे सात मृतदेह सापडले. त्यातील दोन अतिरेकी आहेत तर पाच लष्कराचे जवान आहेत. यात कर्नल, मेजर, दोन लष्करी कर्मचारी आणि एक पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.