‘या’ सामन्यानंतर लसिथ मलिंगा घेणार क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बांगलादेशविरुद्ध २६ जुलै रोजी होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर मलिंगा क्रिकेटला गुडबाय करणार आहे. श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्‍ने याने याची माहिती दिली आहे. मलिंगाचा समावेश बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांसाठी करण्यात आला आहे. श्रीलंका या मालिकेत तीन एकदिवसीय सामने खेळणार असून पहिल्या सामन्यानंतर मलिंगा निवृत्त होणार आहे. आर. प्रेमदासा स्‍टेडियम वर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात मलिंगा निवृत्ती स्वीकारणार आहे. मलिंगाने २०११ मध्ये कसोटी सामन्यांतून निवृत्ती स्वीकारली होती. त्यानंतर तो फक्त एकदिवसीय सामने आणि टी-२० सामनेच खेळात होता.

करुणारत्‍ने याने काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितले कि, ३५ वर्षीय मलिंगा फक्त पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. त्याचबरोबर तो म्हणाला कि, मलिंगाने मला फक्त इतकेच सांगितले आहे. मात्र निवड समितीला त्याने काय संगितले आहे हे मला माहित नाही. श्रीलंकेकडून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा मलिंगा हा तिसरा गोलंदाज असून त्याने आतापर्यंत खेळलेल्या २१९ सामन्यात ३३५ विकेट घेतल्या आहेत. त्याच्यापुढे केवळ मुथैया मुरलीधरन आणि चामिंडा वास असून त्यांनी प्रत्येकी ५३४ आणि ४०० विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर या वर्ल्डकपमध्ये देखील त्याने श्रीलंकेसाठी सर्वाधिक १३ विकेट घेतल्या होत्या.

दरम्यान, मलिंगाने २००४ मध्ये श्रीलंकेसाठी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मागील १५ वर्षांपासून तो श्रीलंकेचा प्रमुख गोलंदाज होता. त्याने श्रीलंकेचे कर्णधारपद देखील सांभाळले होते. २०१४ मध्ये जिंकलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये तो संघाचा कर्णधार होता. दोन वेळा फायनलमध्ये पोहोचून देखील श्रीलंकेला विजेतेपद मिळवता आले नाही. २००७ आणि २०११ मध्ये तो सदस्य असलेला श्रीलंकेचा संघ फायनलपर्यंत पोहोचला होता.

आरोग्यविषयक वृत्त