20 वर्षांनी मिटला शेतकऱ्यांमधील बांधाचा वाद, बारामती पोलिसांच्या प्रयत्नाला यश

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामीण भागामध्ये गावकी आणि भावकीमध्ये शेतीच्या बांधावरुन वाद असल्याचे पहायला मिळते. हे वाद एवढे विकोपाला जातात की बांधाच्या वादातून खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बांधाच्या वादाचे दुष्परीणाम संपूर्ण कुंटुंबाला आयुष्यभर भोगावे लागतात. हा वाद कोर्टात गेला तर हा वाद वर्षानुवर्षे चालतो. मात्र, योग्यवेळी संबंधितांना सल्ला आणि समुपदेशन केले तर असे वाद गावपातळीवरच मिटवले जातात. याचे ताजे उदाहरण म्हणजे बारामती तालुक्यातील पिंपळी येथील आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये असलेला बांधाचा वाद तब्बल वीस वर्षांनी मिटला. यासाठी बारामती पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे व गावातील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आणि हा वाद मिटला.

पिंपळीच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामदेव शिंदे यांनी गावाचा दौरा केला. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी ते गावकऱ्यांना आवाहन करत होते. त्यावेळी पिंपळी गावातील नागरिकांना सूचना देत असताना पिंपळी गावाकडे प्राधान्याने लक्ष देईल. गावच्या अडीअडचणी गाव स्तरावर सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिल्यानंतर बरेचसे वाद विकोपाला न जाता गावात मिटवण्यात आले.

त्यामधील एक वाद हा वीस वर्षे जुना होता. एका शेतजमीनीचा 20 वर्षापूर्वीचा वाद पुढे आल्यानंतर शिंदे यांच्या सूचनेनंतर पंच कमिटीतील सदस्यांच्या मदतीने तुलशीदास केसकर व सर्जेराव पिसाळ आणि मच्छिंद्र पिसाळ या तिन्ही शेतकऱ्यांना एकत्र विश्वासात घेण्यात आले. त्यांना बंधुभाव जपत वाद मिटवण्यासाठी विनंती करण्यात आली. या शेतकऱ्यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन विस वर्षापूर्वीचा वाद मिटवून घेतला. हा वाद मिटवण्यात ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामस्थांना यश आले. हा वाद शांततेत मिटल्यानंतर ग्रामस्थांनी बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचे आभार मानले. याशिवाय कोरोना काळात नागरिकांना सुरक्षा पोहचवणाऱ्या पोलिसांसाठी पोलीस ठाण्याला सॅनेटायजर भेट देऊन आभार मानले.