‘गतवर्षी पवारांनी हेक्टरी 25 ते 30 हजारांची मदत मागितली होती, आज भूमिका बदलली’ : गोपीचंद पडळकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूरात पोहचले आहेत. तर महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मराठावाडा दौऱ्यावर असून उस्मानाबादमधील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आजपासून पाहणी दौरा सुरू होत आहे. बारामतीमधून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्र्यांच्या आणि खासदार शरद पवार यांच्या दौऱ्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “राज्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात काही भागात अतिवृष्टी झाली होती. तेव्हाही पवार साहेबांनी विरोधी पक्ष म्हणून पाहणी दौरा केला होता. तेव्हा त्यांनी हेक्टीर 25 ते 30 हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती. मात्र काही दिवसात ते सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर त्यांना या घोषणांचा विसर पडला. विदर्भात महापूर आला. कोकणात चक्रीवादळ आलं पण तिथंही या सरकारकडून मदत मिळाली नाही. आताही महाराष्ट्र पाण्याखाली आहे. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे आणि तुम्ही दौरे करताय. पवार साहेबांना बांधावर जावं लागतंय मग सरकार काय करतंय” असा सवाल भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारला आहे.

पुढे बोलताना पडळकर म्हणाले, “प्रत्येक वेळेस केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जातं. मदत करण्याची भूमिका केंद्र सरकारनं घेतली परंतु राज्य सरकारनं काय केलं हे सांगावं. अतिवृष्टी झाली केंद्र मदत करेल परंतु राज्यानं केंद्राकडे किती नुकसान झाला याचा आढावा तरी पाठवला पाहिजे. तहसिलदार पोहचत नाही. प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत नाही. राज्य सरकारनं नुकसानीचा आढावा तरी घ्यायला हवा. केंद्र सरकारनं प्रत्येक वेळेस मदत केली. कोरोना काळातही मदत केली परंतु राज्य सरकारनं 1 योजना दाखवावी” असं आवाहन देखील त्यांनी ठाकरे सरकारला केलं.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरही टीका
पडळकर म्हणतात, “मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर 6 महिन्यांनंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही ब्रेकिंग न्यूज होते. असं असेल तर महाराष्ट्रासाठी दुर्दैव दुसरं काही नाही. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही अपेक्षा धरली नाही. निर्णय घेण्याची क्षमता नाही, कोणतीही अंमलबजावणी नाही. प्रत्येक अडचणीच्या काळात विरोधी पक्षनेते गावागावात पोहोचले आहेत. कोरोना, चक्रीवादळ, विदर्भ पूर प्रत्येक ठिकाणी देवेंद्र फडणवीस लोकांच्या मदतीसाठी पोहोचले आहेत” असंही पडळकर म्हणाले आहेत.