भारताच्या गानकोकिळेचा आज वाढदिवस, लतादिदीं ‘तुम जियो हजारो साल’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – गाणकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडसह देशविदेशातील विविध भाषांतील गाण्यांना त्यांनी मोहक आवाजाने स्वरबद्ध केले आहे. लतादिदी आज 91 वर्षांच्या झाल्या आहेत. वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर बॉलिवूड, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

गायनाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना भारत रत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण आणि दादासाहेब फाळके अवार्ड सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला होता. त्यांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

लता मंगेशकर अर्थात लतादिदींनी आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर ’गानकोकिळा’ अशी बिरुदावली आपल्या नावासमोर मिळवली. दीदींची कारकिर्दीची सुरुवात 1942 मध्ये झाली होती. ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी हजारहून अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत. तर अनेक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये देखील गायन केले आहे. 2001 साली त्यांना ’भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये देखील विक्रम नोंदलेले आहेत.