लता मंगेशकरांनी सांगितली रेडिओवरील पहिल्या गाण्याची आठवण !

पोलीसनामा ऑनलाइन – दिग्गज गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) गेल्या अनेक दशकांपासून आपल्या आवाजानं चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. आज वयाच्या 91 वर्षी देखील त्या सोशलवरून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. सोशलवरून ते अनेक अपडेट देताना दिसत असतात. नुकतीच त्यांनी रेडिओवरील त्यांच्या पहिल्या गाण्याची आठवण सांगितली आहे.

लता दीदींनी ट्विट करत लिहिलं की, आजच्या दिवशी 79 वर्षांपूर्वी (16 डिसेंब1941 साली) मी माझ्या कारकीर्दीतील रेडिओवरील पहिलं गाणं गायलं. माझ्या वडिलांनी जेव्हा रेडिओवर माझा आवाज ऐकला तेव्हा ते खूप खुश झाले. त्यांनी माझ्या आईलाही ही आनंदाची बातमी सांगितली होती. आता मला कुठल्याच गोष्टींची चिंता नाही असं म्हणत त्यांनी माझं कौतुक केलं होतं.

लता दीदींचं हे ट्विट सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहते त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत.

लता दीदी आजही अविवाहित आहेत. एका मुलाखतीत त्यांनी अविवाहित राहाण्याचं कारण सांगितलं होतं. लता दीदी म्हणाल्या होत्या, “मी 13 वर्षांची असताना माझे वडिल वारले. यानंतर घरातील प्रत्येक जबाबदारी माझ्यावर होती. अशात खूपदा लग्नाचा विचार मनात येऊनही मी लग्न करू शकले नाही. खूपच कमी वयात मी कामाला सुरूवात केली. कामही भरपूर होतं. विचार केला आधी भावंडांना मार्गी लावू मग लग्नाचा विचार करू. नंतर बहिणीचं लग्न झालं. त्यांना मुलं झाली. त्यांना सांभाळंल. असं करत करत लग्नाची वेळही निघून गेली.”

लता दीदी पुढे म्हणाल्या, “भावंडांसाठी मी आई आणि वडिल अशा दोन्ही भूमिका पार पाडल्या. मी त्यांना कधीच रागावले नाही. आम्ही सांगलीत मोठ्या घरात राहायचो. आम्ही कधीच भांडण केलं नाही. आमच्या वडिलांनी ते घर बांधलं होतं.

1958 सालापासून लता दीदींनी फिल्मफेअर पुरस्कारापासून अनेक पुरस्कार मिळवण्यास त्यांनी सुरुवात केली. 2001 साली त्यांना भारत रत्न आणि महाराष्ट्र भूषण असे अनेक पुरस्कार मिळवले आहेत.