ऋषीजी तुम्ही ‘कर्ज’ चित्रपटाप्रमाणे पुर्नजन्म घ्या; लता मंगेशकर यांची भाविनक साद

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर भारताची गानगोकिळा लता मंगेशकर खूपच भावनिक झाल्या आहेत. त्यांनी ट्विट करुन ऋषी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. लतादिदींनी कर्ज चित्रपटातील ओम शांती ओम या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या गाण्यामध्ये ऋषी कपूर धम्माल डान्स करताना दिसत आहेत. ऋषीजी मला तुमची खूप आठवण येत आहे. खरंच वेड्यासारखा विचार आहे, परंतु कर्ज चित्रपटाप्रमाणे तुम्ही पुर्नजन्म घेऊन परत आलात तर खूपच आनंद होईल. अशा आशयाची पोस्ट लतादिदींनी या व्हिडीओवर लिहिली आहे. त्यांनी ट्विट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लता दीदींच्या पोस्टनंतर काही तासांत शेकडो नेटकर्‍यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ऋषी कपूर यांनी जवळपास 92 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन ऋषी कपूर भारतात परतले होते. 11 महिने 11 दिवस न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन ते भारतात परतले होते. परदेशी उपचार सुरू असताना त्यांनी अनेकदा मायदेशी येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्यांची खूप इच्छा होती. मला पुन्हा काम मिळेल ना, अशी चिंता ते मुलांकडे व पत्नीकडे व्यक्त करत होते. अखेर गुरुवारी त्यांचे निधन झाले. त्यानंतर सिनेसृष्टीसह अनेकांना दुःख झाले आहे.