खुशखबर ! सोन्याच्या किंमतीत 7 वर्षातील सर्वात मोठी घसरण, आता किरकोळ बाजारामध्ये होऊ शकतं 3000 रूपयांपर्यंत ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेअर बाजारानंतर आता जगभरातील सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. वृत्तानुसार कोरोना व्हायरसमुळे उद्योग क्षेत्रात मंदी आल्याने आणि शेअर बाजारात घसरण झाल्याने त्या तोट्यातून सावरण्यासाठी गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री केली. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमती 5 टक्क्यांनी कमी झाल्या होत्या. 2013 नंतर सोन्याच्या दरात एक दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे. तज्ज्ञांच्या मते याचा परिणाम देशांतर्गत बाजारात पाहायला मिळाला.

सोनं महागल्याने सामान्य माणूस लग्नसराईत देखील सोने खरेदीपासून दूर झाला होता. मागील आठवड्यात, तीन दिवसात सोनं 1000 रुपयांनी स्वस्त झाले होते. पुढे काही दिवसात सोन्याच्या किंमतीत 3,000 रुपयांपर्यंत घसरण येऊ शकते.

सोन्या चांदीसह प्लॅटिनमच्या किंमतीत घट –
वृत्तानुसार, शुक्रवारी सोनं 4.5 टक्क्यांनी कमी होऊन 1571 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले होते. ही जून 2013 नंतरची सर्वात मोठी घसरण आहे. चांदी आणि प्लॅटिनमच्या किंमतीत 2008 नंतरची ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.

किती स्वस्त होणार सोनं –
केडिया कमॉडिटीचे एमडी अजय केडिया म्हणाले, नफा झाल्याने जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे, पुढील आठवड्यात काही रिकव्हरी होऊ शकते. परंतु आणखी वाढ होण्याची शक्यता दिसत नाही. देशांतर्गत बाजारात सोनं 5 – 7 टक्के स्वस्त होऊ शकते. केडिया म्हणाले की देशांतर्गत सराफ बाजारात सोनं 43,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवरुन कमी होऊन 39 हजार प्रति 10 ग्रॅम होऊ शकते.

मार्च महिन्यात कमी होतात सोन्याचे दर –
केडिया म्हणाले की, मागील 10 वर्षांचा विचार केला तर मार्च महिन्यात सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. 2012 आणि 2018 या वर्षात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली नव्हती.