आनंद महिंद्रा यांनी पूर्ण केले आश्वासन ! शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन यांच्यासह ‘या’ खेळाडूंना देण्यात येईल महिंद्रा थार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे मालक आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. ते दररोज विविध विषयांवर आपले मत व्यक्त करतात. त्यांना क्रिकेटची विशेष आवड आहे. यावर्षी जानेवारीत जेव्हा भारतीय संघाच्या युवा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर विजय मिळविला, तेव्हा देखील आनंद महिंद्रा आपल्या भावना व्यक्त करण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यांनी तातडीने ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेलेल्या 6 युवा खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून त्यांची लोकप्रिय ऑफ-रोडर एसयूव्ही महिंद्रा थार देण्याचे आश्वासन दिले. महिंद्रा यांनी नुसतेच आश्वासन दिले नाही तर त्यांनी या खेळाडूंना थारची भेट दिली आहे, स्वतःच काही खेळाडूंनी याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन यांनी शेअर केली पोस्ट :

भारतीय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन यांनी त्यांच्या अधिकृत अकाउंटवर नवीन थार रिसीविंगची पोस्ट शेअर केली आहे. देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ज्या खेळाडूंना महिंद्राची सॉलिड ऑफ रोडर ‘थार’ भेट देण्याचा निर्णय घेतला, त्यात मोहम्मद सिराज, टी नटराजन, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे. या घोषणेसह आनंद महिंद्राने ट्विटरवर लिहिले की, ‘ही भेट देण्याचे एकमात्र कारण म्हणजे तरुणांना स्वतःवर विश्वास ठेवण्यास प्रेरित करणे.

‘थार’ सर्वाधिक मागणीत:

स्वदेशी वाहन निर्माता कंपनी महिंद्राची ‘थार’ एसयूव्हीची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तिचा वेटिंग पिरियड सुमारे 8 महिने आहे. थारच्या पॉवरविषयी बोलायचे झाल्यास या दमदार एसयूव्हीमध्ये 2.2 लीटर डिझेल इंजिन आहे जे 130bhp आणि 320Nm टॉर्क जनरेट करते, त्याव्यतिरिक्त 2.0 लिटर mStallion टर्बो पेट्रोल इंजिनची सुवीधा आहे. जे 187bhp पॉवरवर 380Nm टॉर्क जनरेट करण्याच्या क्षमतेचा आहे. याशिवाय मल्टी इन्फोर्मेशन डिस्प्ले, स्टीयरिंग माउंट कंट्रोल, एसी, सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह क्रूझ कंट्रोल अशी अनेक वैशिष्ट्ये यात आहेत.

32 वर्षानंतर गाबामध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव :

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे सर्वात कठीण मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाबामध्ये 32 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा भारत पहिला देश ठरला. ज्यात तरूणांनी खूप महत्वाची भूमिका बजावली. यामध्ये शुभान गिल, ऋषभ पंत या युवा फलंदाजांची शानदार फलंदाजी आणि मोहम्मद सिराज, टी नटराजन, शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी सारख्या गोलंदाजांचा समावेश होता. यामुळे 2020-21 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला 2-1 ने पराभूत केले.