मुंबई पोलिसांकडून 16291 वाहने जप्त, घरापासून 2 किमीपर्यंत जाण्याची परवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात मुंबई शहरामध्ये कोरोना व्हायरस साथीच्या आजाराचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता लॉकडाऊनचे कडक नियम लागू केले असून व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी वाहनांच्या वापरावर देखील प्रतिबंध घालण्यात आले आहेत. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. रविवारी करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 16291 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

मुंबई पोलिसांनी नवीन नियम लागू केला आहे, जे नागरिक आपल्या घरापासून 2 किमीच्या परिघाबाहेर जातील त्यांची वाहने जप्त केली जाणार आहेत तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये कार्यालये किंवा वैद्यकीय आपत्कालीन कमासाठी प्रवास करणाऱ्या लोकांना सूट देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे म्हटले आहे की, 28 जून रोजी 7000 पेक्षा अधिक नागरिक विनाकारण गाड्या घेऊन फरताना आढळून आले. वैध कारणाशिवाय आपल्या स्थानिक भागापासून दूर आढळून येणारी सर्व वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. शहरातील जवळपास 12 भागात सुमारे 7000 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहने जप्त करण्याची पोलिसांची ही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वी मार्चमध्ये पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली, त्यावेळी देशभरातील पोलिसांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हजारो वाहने जप्त केली होती. मात्र, जप्त करण्यात आलेली वाहने परत वाहन मालकांना कधी देण्यात येणार याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, बऱ्याच प्रकरणांमध्ये मालकाला दंड व लॉकडाऊन नियम शिथिल केल्यानंतर वाहने परत केली गेली आहेत.