Latur : गीता परिवाराच्या माध्यमातून नोंदला गेला विश्वविक्रम ! 70 देशातील 61 हजार साधकांनी एकाच वेळी केले सामुहिक गीतापठण

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – गीता परिवाराच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या सामुहिक गीतापठण कार्यक्रमात ७० देशातील ६१हजार १८४ साधकांनी एकाच वेळी भगवद्गीतेच्या बाराव्या व पंधराव्या अध्यायाचे पठण केले.या माध्यमातून विश्‍वविक्रम नोंदला गेला.भगवद्गीतेचे पठण करण्यासोबतच त्यातील तत्वांचे आचरण केले जावे,असे मत आचार्य बालकृष्ण यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

मोक्षदा एकादशीला साजऱ्या केल्या जाणाऱ्या गीता जयंतीनिमित्त गीता परिवाराच्यावतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. आचार्य बालकृष्ण,गीता परिवाराचे प्रमुख पुज्य गोविंददेव गिरीजी महाराज (आचार्य किशोरजी व्यास )यांच्यासह ऑस्ट्रेलिया,अमेरिका,इंग्लंड, युनायटेड अरब इमिरात, न्यूझीलंड, नेपाळ आदी ७० देशातील हजारो साधक या उपक्रमात सहभागी झाले होते.फेसबुकच्या माध्यमातून ८हजार ९००,यु ट्युबवर ५१ हजार २८४ आणि झूमच्या माध्यमातून १ हजार असे एकूण ६१ हजार १८४ साधक या उपक्रमाशी जोडले गेले होते.लातूर जिल्ह्यातील ५ हजार साधकांचाही या उपक्रमात सहभाग होता.

श्रीमती सुवर्णाकाकी मालपाणी,सौ.सुनिता अट्टल,सौ.मंजू मणियार,सौ.मंजू सोमाणी, सौ.छाया कर्वा,सौ.प्रज्ञा डांगे,सौ.रचना मालपाणी यांच्या नेतृत्वात या साधकांनी एकाचवेळी गीतेच्या बाराव्या व पंधराव्या अध्यायाचे पठण केले. यावेळी मार्गदर्शन करताना आचार्य बालकृष्ण म्हणाले की, मानवी जीवन हा ईश्वराने दिलेला प्रसाद आहे.भारतीय संस्कृतीची शक्ती आपल्याला लाभलेली आहे.भारतीय उदात्त परंपरा पुन्हा स्थापित केल्या पाहिजेत.

भगवद्गीतेची तत्व आचरणात आणली तर तीच तत्व आपले रक्षण करू शकतात,असे त्यांनी सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले की,भगवंताला क्रियाशील भक्ती हवी आहे.गीतेतील विचारांनी कर्तव्यनिष्ठा जागृत होते.मी स्वतःसाठी नाही तर सृष्टीसाठी आहे,ही भावना पुढे येते.पुढच्या पिढीवर संस्कार व्हावेत,त्यांच्यात राष्ट्रभक्तीचे विचार वाढीस लागावेत यासाठी गीता परिवार काम करत आहे. भारत मातेची सेवा हीच परमात्म्याची सेवा आहे.भारतमाता ही सर्वांची माता असून विश्वबंधुत्व वाढवणारा हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी ऑस्ट्रेलियातून श्रीमती नीता भुतडा यांनी प्रार्थना सादर केली.मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले.या उपक्रमाचे संचलन डॉ.संजय मालपाणी यांनी केले. आशू गोयल यांनी सहभागी झालेल्या मान्यवरांचा परिचय करून दिला तर आभार प्रदर्शन दक्षिणांचल विभागाचे प्रमुख हरीनारायण व्यास यांनी केले.अनेक देशांतून सहभागी झालेल्या साधकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

लातूर जिल्ह्यातून अधिकाधिक साधकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी गीता परिवार लातूरच्या अध्यक्षा सौ. पुष्पा मालू, उपाध्यक्ष सौ.राजश्री कर्वा, सचिव सौ.मीनाक्षी सारडा, कोषाध्यक्ष नंदकिशोर बाहेती, गीता प्रचार प्रमुख श्रीमती कांता धूत यांनी परिश्रम घेतले.