लातूर: Latur Accident News | मित्राची पोलिस भरतीमध्ये निवड झाली म्हणून जेवणाची पार्टी करून घराच्या दिशेन परत येत असताना भरधाव कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. हे चारही जण रेणापूर तालुक्यातील कारेपूर गावचे होते. त्यांच्या मृत्यूमुळे कारेपूर गावावर शोककळा पसरली आहे.
या भीषण अपघातामध्ये बालाजी शंकर माने (वय-२७), दिपक दिलीप सावरे (वय-३०), फारुख बाबू मिया शेख (वय-३०) आणि ऋतिक हनुमंत गायकवाड (वय-२४) यांचा मृत्यू झाला. तर अजीम पाशामीया शेख (वय-३०) व मुबारक सत्तार शेख (वय-२८) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या कारेपूर गावातील तरुण अजीम पाशामिया शेख याची पुण्यातील दौंड येथे एसआरपीआय पदावर निवड झाली होती. याचाच आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सोमवारी रात्री कारेपूर गावातील ६ मित्र कारने मांजरसुंबा येथे गेले. जेवणाची पार्टी झाल्यानंतर ते सर्वजण संभाजीनगर- लातूर राष्ट्रीय महामार्गावरून परत येत होते. त्यावेळी बीड जिल्ह्यातल्या वाघाळापाटी येथे कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली.
कारेपूर येथील बालाजी माने या २७ वर्षीय तरुणाचे गतवर्षी लग्न झालेले होते. पुढील दोन दिवसांत डॉक्टरांनी त्याच्या पत्नीला बाळंतपणाची तारीख दिलेली होती. बाप होण्याचे त्याचे स्वप्न लवकरच साकार होणार होते. चार बहिणीनंतर जन्मलेला फारुख शेख या ३० वर्षीय युवकाला एक वर्षाची मुलगी आहे.
३० वर्षीय दिपक सावरे याला १ वर्षाचा मुलगा असून ज्या गाडीचा अपघात झाला. ती गाडी चालवून तो घर चालवत होता. अविवाहीत असलेला २४ वर्षीय युवक ऋत्विक गायकवाड हा शेती आणि टोमॅटोचा व्यवसाय करत होता.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
https://www.instagram.com/policenamaa/?hl=en#