Latur : किनी कदू येथील प्राचीन सतीशिळेचा उलगडा झाला ! शहिद वीराच्या पत्नीचं ‘सहगमन’

अहमदपूर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदपूर तालुक्यातील किनी कदू येथे लातूर जिल्ह्यात प्राचीन सतीशिळा आहे. या सतीशिळेच्या शोधामुळं किनी कदू गाव व लातूर जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासात भर पडलेली आहे. महाराष्ट्र व कर्नाटकात काही गावात अशा सतीशिळा असतात. एखाद्या लढाईत किंवा अन्य कारणानं गावातला एखादा वीर शहिद झाला किंवा त्यास वीरमरण आलं तर वीरगळ कोरून ठेवत असत. तसंच त्या वीर मरण पावलेल्या वीरासोबत त्याची पत्नी सती गेल्यास सहगमन सतीशिळा कोरून ठेवली जात असे. बाराव्या शतकानंतर ब्रिटीश काळापर्यंत ही सतीप्रथा समाजात होती. ब्रिटीशांनी कायदा करत या प्रथेचा पायबंद केला.

किनी कदू येथे किमान 500 वर्षांपूर्वीची ही सतीशिळा आहे. ती एक सहगमन सतीशिळा आहे. ही सतीशिळा 3 टप्प्यात कोरलेली आहे. किनी कदू किनी कदू गावातील एक वीरपुरुष शहिद झाल्यानंतर त्याची पत्नी हया वीरा समवेत सती गेल्याचं ते एक स्मारक प्राचीन शिल्प आहे. ही सतीशिळा 3 टप्प्यात कोरलेली आहे. खालच्या टप्प्यात दोघं पती पत्नी सहगमन सती गेल्याचं शिल्प कोरलं आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वीर स्त्रीचे घोड्यावर आरूढ शिल्पांकन आहे दोन्ही हातात गोल गोल कडे आहेत.

या सतीशिळेवर सतीचा हात कोरलेला आहे. तो वर स्वर्गाच्या दिशेनं दाखवला आहे. तिच्या हातात 5 काकणं(चुडा) भरलेली आहेत. हेच सतीशिळेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यानंतर वीरमरण पावलेल्या सतीपतीचे स्वर्गात स्वागत करणाऱ्या या 2 अप्सरा नमस्कार मुद्रेत दाखवल्या आहेत. त्याखाली नंदीची प्रतिमा कोरलेली आहे. सर्वात वरच्या शेवटच्या टप्प्यात कलश स्वर्गस्थळ दाखवलं असून त्या बाजूस सूर्य व अर्धचंद्र कोरलेले आहेत. सुर्य व चंद्र असे पर्यंत या दोघांची किर्ती जगात अजरामर राहिल असा त्याचा अर्थ आहे.

अशा या दुर्मिळ प्राचीन प्राचीन ऐतिहासिक सहगमन सतीशिळा शिल्पाचा अभ्यास गावचे सुपुत्र व भारतीय प्राच्य विद्याशास्त्राचे अभ्यासक व संशोधक डॉ भीमराव ब्रम्हाजीराव पाटील यांनी केला आहे आणि त्या प्राचीन सतीशिळेवर ऐतिहासिकदृष्ट्या प्रकाश टाकला आहे. गेल्या 1 महिन्यात या सतीशिळेचा अभ्यास करून डॉ भीमराव पाटील यांनी या सतीशिळा शिल्पाचा अर्थ उलगडून दाखवला आहे.

मिरज जिल्हा सांगलीचे इतिहास संशोधक प्रा मानसिंग कुमठेकर व प्रा गौमत काटकर तसंच पुण्याचे संशोधक अनिल दुधाणे यांनीही या सहगमन सतीशिळेचा अभ्यास करून ही प्राचीन सहगमन सतीशिळा असल्यानं मत नोंदवलं आहे. गावातील थोरपुरुष शहिद झाल्यानं त्याची पत्नी त्याच्यासोबत सती गेल्याची स्मारक शिला म्हणजे सहगमन सतीशिळा असं या संशोधकांचं मत आहे.

लातूर व महाराष्ट्रातील ही एक दुर्मिळ सहगमन सतीशिळा किनी कदू या गावात आपला इतिहास सांगत उभी आहे. एका वीर पराक्रमी शुराचा तो इतिहास आहे आणि त्यासोबत सती गेलेल्या सतीचा तो इतिहास आहे. अशा या प्राचीन सहगमन सतीशिळेचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.