जालन्यात रावसाहेब दानवेंना ‘धक्का’ तर अमित देशमुख लातूरमध्ये ‘फेल’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या निवडणूकांचे वारे वाहू लागले आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आल्याने भाजपला धक्का बसला. तर काही ठिकाणी भाजपने महाविकास आघाडीतील बंडखोरांच्या मदतीने सत्ता काबीज केली.

मात्र, जालना जिल्हा परिषदेत ही किमया करण्यात भाजपला अपयश आले. या जिल्हापरिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असून हा रावसाहेब दानवे यांना एकप्रकारे धक्काच आहे. जालना जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तम वानखेडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे महेंद्र पवार यांची निवड झाली. त्यामुळे केंद्रीय मंत्री आणि जालन्यातील भाजपचे ताकदवर नेते रावसाहेब दानवे यांना जोरदार धक्का बसला आहे.

दुसरीकडे, लातूर जिल्हा परिषद पुन्हा भाजपच्या ताब्यात गेली आहे. लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या राहुल केंद्रे तर उपाध्यक्षपदी भारतबाई दगडू सोळुंके यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघात विजय मिळवणाऱ्या काँग्रेसच्या अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांची जिल्हा परिषदेत मात्र त्यांची जादू चालली नाही.

अमरावतीत आघाडी तर वर्ध्यात भाजपचे वर्चस्व
अमरावती जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. तर वर्धा जिल्हा परिषदेत भाजपचे वर्चस्व पहायला मिळाले. जिल्हा परिषद अध्यक्षपदी सरीता गाखरे तर उपाध्यक्षपदी वैशाली येरावार यांची निवड झाली. वर्ध्यात महाविकास आघाडीचे पानिपत झाल्याचे पहायला मिळाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/