धक्कादायक ! लातूरमध्ये ‘कोरोना’ग्रस्ताच्या नातेवाईकांनी केला चक्क डॉक्टरांवर चाकू हल्ला

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लातूर येथील कोरोना संसर्गित रुग्णावर उपचार करणाऱ्या एका खासगी डॉक्टरवरती कोरोना संसर्गित रुग्णांचा नातेवाईकांनी बुधवारी (दि. २९) सकाळी चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये सुदैवाने डॉक्टर बचावले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोरोना संसर्गित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी हे कृत्य केल्याने, त्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयावर ताण वाढला असून खासगी डॉक्टरांनी पुढे येऊन कोरोना संसर्गित रुग्णांवर उपचार करावेत, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद सुद्धा खासगी रुग्णालयाकडून देण्यात आला. मात्र, अशात लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लातूरमधील अल्फा सुपरस्पेशालिटी या खासगी रुग्णालयात एका रुग्णाच्या नातेवाईकाने आज, कोरोना संसर्गित रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर चाकू हल्ला केला आहे. डॉ. दिनेश वर्मा असे या डॉक्टरांचं नाव आहे. या प्राणघातक हल्ल्यातून ते बचावले आहेत. सध्या त्यांच्यावरती लातूरच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

मागील चार दिवसांपासून उदगीर येथील एका वयोवृद्ध महिलेवर या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या महिलेला मधुमेहाचा त्रास होता. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचं नातेवाईकांना माहिती होते. पण उपचारादरम्यान या महिलेचा पहाटे मृत्यू झाला. त्यानंतर बुधवारी सकाळी या महिलेचे काही नातेवाईक डॉ. वर्मा यांच्या रुग्णालयात आले. त्याच वेळी एका नातेवाईकांने डॉ. वर्मा यांच्यावर चाकू हल्ला केल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असून, लातूरमधील संघटनेने या घटनेचा निषेध केला.

यासंदर्भात बोलताना लातूर जिल्हा आयएमएचे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी म्हणाले, सध्याच्या कठीण काळात सुद्धा डॉक्टर रुग्णांची सेवा करत आहेत. अशा वेळी ही घटना घडणे निंदनीय आणि निषेधार्य असून, आरोपींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच अमित देशमुख यांनी देखील या प्रकरणात लक्ष घालावे, असे त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी नटवरलाल सगट याला अटक केली आहे.