लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – Latur Crime News | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या वादावरून मारहाणीची घटना घडली. यावेळी लोकांची पळापळ झाली. दरम्यान गावालगतच्या शेतात काम करणाऱ्या शिक्षकालाही जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुलिंग अशोक हासुरे (वय-३८) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ही घटना औंढा (ता. निलंगा) येथे शनिवारी (दि.२६) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत कासार सिरसी पोलिस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुलिंग हासूरे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, एक भाऊ असा परिवार आहे. (Murder Case )
अधिक माहितीनुसार, औंढा गावात शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीदरम्यान वेगवेगळ्या समाजात वाद झाला होता. तो आपसामध्ये मिटलाही होता. मात्र, शनिवार, (दि.२६) रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गावातील दत्तू मारोती गायकवाड याने जयंतीवरुन वाद का केला? असे म्हणून दुसऱ्या समाजातील दोघांसोबत हुज्जत घातली. याचे पर्यावसन हाणामारीमध्ये झाले.
यावेळी लोकांची एकच पळापळ सुरू झाली. बडूर येथील शिक्षक गुरुलिंग हासुरे हे आपल्या शेतात काम करत होते. आरोपींनी हासुरे यांना जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचा मृत्यू झाला. याबाबत कासार सिरसी ठाण्यात मयताचे काका गुंडाप्पा शिवाप्पा हासुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, दत्तू मारोती गायकवाड (रा.औंढा), अजय महेश चौंडा, अझर मोहम्मद, आदित्य मोरे, गजेंद्र शिवराज सरवदे, स्वप्निल सूर्यवंशी (सर्व रा. कासार सिरसी), संजय लक्ष्मण गायकवाड, राजेंद्र गोरख गायकवाड, शहाजी किशन गायकवाड (रा. औंढा) याच्यासह अन्य एका अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय पाटील करीत आहेत.