Latur News : मोबाईलवर मोठ्याने बोलू नको म्हटल्याने एकाचा दगडाने ठेचून खून

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन –  घरासमोर मोबाईलवर मोठ्याने बोलू नका असे म्हटल्याचा राग आल्याने घरात घुसून एकास गावातील आठ ते दहा तरुणांनी काठीने व दगडाने ठेचून निर्घूण खून केला. निलंगा तालुक्यातील बामणी येथे शुक्रवारी (दि. 19) रात्री ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली असून आठजण फरार आहेत. या घटनेमुळे गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जगन्नाथ किशन शिंदे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मृत शिंदे यांची बहिण सुनिता अर्जून रणदिवे यांनी निलंगा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बापू ढाले, हाणमंत गायकवाड, राम गायकवाड, गोरख गायकवाड, अरविंद गायकवाड, शशिकांत गायकवाड, मल्हारी गायकवाड, दिगंबर गायकवाड, शंभो गायकवाड, शाम गायकवाड (सर्व रा. बामणी, ता.निलंगा) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

निलंगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील काही तरूण शिंदे यांच्या घराच्या शेजारील कॅनलजवळ बसून मोबाईलवर मोठ-मोठ्या आवाजात बोलत होते. त्यावेळी जगन्नाथ शिंदे व अन्य काही जणांनी त्यांना मोठ्याने बोलू नका, असे म्हणाले. त्याचा राग मनात धरून गावातील दहा तरूणांनी घरासमोर बोलावून तू आम्हाला फोनवर मोठ्या आवाजाने बोलण्यास का विरोध करतोस असे म्हणत काठी व दगडाने बेदम मारहाण केली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान संबंधित सर्व आरोपीना अटक झाली नसल्यामुळे संतप्त नातेवाईकानी निलंगा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. तपास पोलिस निरीक्षक अनिल चोरमले करत आहेत.