लातूर : शुभमंगल ‘सावधान’ नाही तर ‘कोरोना’चं निमंत्रण, 32 जणांना लागण

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस विक्रमी वाढ होत आहे. राज्यात लॉकडाऊन नंतर अनलॉकमध्ये अनेक उपक्रमांना परवानगी देण्यात आली. मात्र अनलॉकमध्ये राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. लॉकडाऊन काळात लग्न समारंभास परवानगी नसल्याने अनेकांचे लग्न रखडली होती. मात्र अनलॉकमध्ये लग्न कार्यास परवानगी दिल्याने इच्छूकांचे लग्न होऊ लागले आहे. परंतु या लग्न समारंभातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
लातूर जिल्ह्यातील सध्या उपचार सुरु असलेल्या 184 रुग्णांपैकी कोणाला कसा संसर्ग झाला याची माहिती प्रशासनाकडून घेण्यात आली. याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मंगळवारी (दि.7) फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात दिली.

त्यानुसार लग्न कार्यात सहभागी होऊन नातेवाईकांची मर्जी सांभाळणे 32 जणांना चांगलेच महागात पडले आहे. या सर्वांना लग्न सोहळ्यातूनच कोरोनाची लागण झाली असून तब्बल 46 जणांना खासगी व धार्मिक कार्यक्रमातील सहभाग अंगलट आला आहे. विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्याने या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना लक्षण दिसून आल्यानंतर रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात येते. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचेही स्वॅब घेऊन तपासणी केली जाते. यातूनच कोणाच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाली याचा शोध आरोग्य यंत्रणा आणि पोलीस घेते. यामध्ये अनेक रुग्णांनी गमतीशीर माहिती दिली.

नेहमीप्रमाणे नातेवाईकांच्या तसेच जवळच्या व्यक्तीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जाणे टाळणे शक्य नसल्याचे अनेकांनी सांगितले. यातूनच 50 लोकांच्या उपस्थितीत लग्नाला परवानगी देऊनही 32 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. लग्न सोहळ्यास प्रशासनाने 50 लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे. मात्र, प्रशासनाच्या आदेशाला डावलून अनेक लग्न समारंभामध्ये 50 पेक्षा अधिक लोक उपस्थित रहात असल्याचे दिसून येत आहे. सध्या लातूरमध्ये उपचार सुरु असलेल्या 184 पैकी 23 व्यापारी असून 53 रुग्ण बाहेरगावाहून प्रवास करून आले आहेत. 27 जणांना खासगी कार्यक्रमातून तर 19 जणांना धार्मिक कार्यक्रमातून कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर अन्य व्यक्तींना विविध तीस कारणांमुळे कोरोनाची बाधा झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.