लातूर जिल्ह्यात ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांची संख्या पोहोचली 356 वर

लातूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे, त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील सहा दिवसांमध्ये तब्बल 110 रुग्ण वाढले असून, 57 जणांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहेत. लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 356 वर पोहोचली आहे, तर 17 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मंगळवारी (दि.30) तपासणीसाठी आलेल्या 189 स्वॅबपैकी 155 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 12 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यामध्ये उद्गीर 1, चाकूर तालुक्यातील दोन, लातूर महानगरपालिका क्षेत्रातून घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी दहा, तर विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेत घेण्यात आलेल्या स्वॅबमधील 9 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.