लातूरमध्ये एकाचा खून करून मृतदेह गोरक्षण विहिरीत टाकला

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंडिया नगर परिसरात राहणार्‍या एकाचा खून करून त्याचा मृतदेह गोरक्षण विहिरीत टाकल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

भावडासिंग जुन्‍नी (40, रा. इंडिया नगर, लातूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. भावडासिंग यांचा खून नेमका कोणत्या कारणासाठी आणि कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.

पोलिस उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. भावडासिंग गेल्या दोन दिवसांपासुन बेपत्‍ता होते. त्यांचा मोबाईल त्यांच्या पत्नीकडे होता. ते बेपत्‍ता झाल्याबाबची तक्रार त्यांच्या कुटूंबियांकडून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.

भावडासिंग यांची यापुर्वी कोणासोबत भांडणे झाली होती का, तसेच त्यांचे कोणत्या कारणावरून कोणासोबत वाद होते काय याबाबत पोलिस माहिती घेत आहेत. गुन्हयाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करीत आहेत.