लातूरमधील हडोळती टोलनाक्यावर 3 वाहनांमध्ये अपघात; 9 जण जखमी

लातूर : अहमदपूर तालुक्यातील हडोळती टोलनाक्याजवळ प्रवासी बस, टेम्पो आणि जीप यांच्यात विचित्र अपघात होऊन त्यात ९ जण जखमी झाले असून दोघे जण गंभीर आहेत. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली.

शिरुर ताजबंद येथून जीप मुखेडकडे जात होती. या जीपच्या पाठोपाठ किराणा साहित्य भरलेला टेम्पो येत होता. शिरुर ताजबंद -मुखेड रोडवरील हडोळती गावापासून काही अंतरावर असलेल्या टोलनाक्याजवळ जीप चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व तो देगलूरहून पुण्याकडे जाणार्‍या प्रवासी बसला समोरून जाऊन जोरात धडक दिली. त्याचवेळी पाठीमागून येणार्‍या टेम्पोचालकाही आपले नियंत्रण राखता आले नाही व तो जीपला पाठीमागून धडकला. अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना उपचारासाठी हडोळती प्राथमिक आरोग्य केंद्र व अहमदपूरला पाठविले. या अपघातामुळे सुमारे १ तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.