‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियानाचा पुण्यात शुभारंभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यासाठी त्यांनी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम राबवण्याबाबत सांगितले. 15 सप्टेंबर पासून 10 ऑक्टोबर पर्यंत ही मोहिम राबवली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालयामध्ये ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या अभियानाची सुरुवात शिवसेना गटनेते नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी महानगरपालिका सह आयुक्त संदीप कदम, क्षेत्रीय कार्यालय मुख्य अभियंता प्रसन्न कुलकर्णी, विभागीय आरोग्य निरीक्षक राम सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश साबळे, प्रमोद चव्हाण सचिन लोहकरे, नवनाथ मोकाशी, गणेश साठे, वैजनाथ गायकवाड, हनुमंत पिंगळे, लक्ष्मण काळे, जयंत वानखेडे, प्रशांत खाडे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश चौंधे,गणेश घोलप यांनी सहकार्य केले.

कोरोनाचे संकट वाढत असताना पुनश्च हरिओम म्हणत जनतेचे आयुष्य पूर्व पदावर आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कोरोनाशी दोन हात करण्याच्या प्रक्रियेत शासन आता सर्वसामान्यांना सहभाग करुन घेणार आहे. यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनीधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे. या जनजगृती मोहिमेत लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत पदाधिकारी, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांना सहभागी करुन घेण्यात आले आहे.