मोदींच्या हस्ते ९ जानेवारीला सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचा शुभारंभ ?

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – दक्षिण भारत ते उत्तर भारताला जवळून जोडणाऱ्या सोलापूर – उस्मानाबाद नवीन रेल्वे मार्गाला नीती आयोगाकडून मंजुरी मिळाली असून बुधवारी (दि.९) या नियोजित नवीन रेल्वे मार्गाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सोलापूर – तुळजापूर उस्मानाबाददरम्यान सुमारे ७५ कि.मी. लांबीच्या या मार्गासाठी एकूण ९९४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा रेल्वे मार्ग १ जानेवारी २०२१ पूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे. या मार्गाने मराठवाडा विभागातील उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, औरंगाबाद, सोलापूर, विजयपूर (बिजापूर), बागलकोट, गदग, कोप्पल, बेल्लारी आणि हुबळी-धारवाड ही शहरे रेल्वेने त्यामुळे जोडली जाणार आहेत. त्यामुळे यामहत्त्वपूर्ण मार्गासाठी येथील लोकप्रतिनिधी, तसेच संबंधित विभागातील सर्व रेल्वे संघटनांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या नियोजित मार्गाने तूळजापूरचे नाव प्रथमच रेल्वेच्या नकाशावर येणार असून तुळजा भवानीचे शक्तिपीठही रेल्वे मार्गाने जोडले जाणार आहे. नियोजित या नवीन रेल्वे मार्गाचे भूसंपादन व इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित खासदारांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नियोजित सोलापूर – उस्मानाबाद मार्ग दक्षिण ते उत्तर भारताला जोडणाऱ्या अन्य सर्व रेल्वे मार्गापेक्षा अगदी जवळून जोडणारा मार्ग होणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास या नियोजित मार्गावरून अनेक गाड्या रेल्वे विभागाला चालविण्यास बाध्य होणार व भविष्यात सदर मार्गावरून अधिकाधिक नवीन गाड्या चालविण्यास प्रामुख्याने विचार करण्यात येईल.

नियोजित रेल्वे मार्गासोबत परभणी ते लातूर मार्गावरील अंतर अडीच तासांनी कमी होईल. तसेच लातूर रोड येथे होणारे इंजिन बदलणे टाळण्यासाठी २८ कि.मी. लांबीचे लातूर – पानगाव बायपास मार्ग करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे हर्षद शहा, अरुण मेघराज, प्रा. सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंडे, शंतनू डोईफोडे, डॉ. राजगोपाल कालानी, रितेश जैन, राकेश भट्ट, उमाकांत जोशी, किरण चिद्रवार, अमित कासलीवाल, संभानाथ काळे, रवींद्र मुथा, श्रीकांत गडप्पा, शिवप्रसाद तोष्णीवाल, सय्यद रियाज अली, प्रवीण थानवी, कादरीलाला हाश्मी, दयानंद दीक्षित आदींनी केली आहे.