PM नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोबाईलची ‘ही’ मोठी कंपनी चीनमधून भारतात होणार ‘शिफ्ट’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 12 मेला देशाला उद्देशून भाषण केले होते. लॉकडाउन 4 बदद्ल ते घोषणा करतील अशी सर्वांना अपेक्षा होती. पण त्याबाबत 18 मेपूर्वी निर्णय जाहीर केला जाईल असे त्यांनी सांगितले. कोरोनासोबत लढताना आपल्या देशाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था एका जागीच थांबली पण तिला गती द्यायची असेल तर आत्मनिर्भर म्हणजेच स्वावलंबी व्हायला हवं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. आता Local के लिए Vocal होना पडेगा असं ते म्हणाले होते. स्वदेशी वस्तूंचा वापर आणि भारताबरोबरच जगाला लागणाऱ्या वस्तूंंचं भारतात उत्पादन करण्याचं आवाहन त्यांनी औद्योगिक क्षेत्राला केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला भारतीय मोबाईल कंपनी लावा मोबाईलने तातडीने प्रतिसाद दिला आहे.

लावा मोबाईलने आपले संशोधन व विकास केंद्र, डिझाइनिंग, उत्पादन कारखाने हे सगळेचीनमधून भारतात आणणार असल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान मोदींच्या Local के लिए Vocal या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हा निर्णय घेतला असून येत्या 6 महिन्यांत या व्यवस्था भारतात येतील आणि त्याअंतर्गत कंपनी भारतात 800 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.