कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे कायदा सुव्यवस्था सुरळीत : DCP सुहास बावचे

पुणे : प्रतिनिधी – समाजातील पीडित न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे येतो, त्याला न्याय देऊन गुन्हेगारावर वचक ठेवण्याचे काम पोलीस अधिकारी कर्मचारी करीत आहेत. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे समाजामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राखली जात आहे. अधिकारी-कर्मचारी पोलीस खात्यामध्ये चांगली कामगिरी करीत आहेत. त्यांची प्रशासनाकडून दखल घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाते. जाधव यांनी मागिल 38 वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. त्यांची सेवापूर्ती झाली असली तरी, त्यांच्या अनुभवाचा पोलीस प्रशासनाला नक्कीच फायदा होणार आहे, असे मत परिमंडल-5 चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी व्यक्त केले.

हडपसर गाडीतळ येथे वरिष्ठ पोलीस रघुनाथ जाधव यांचा सेवापूर्ती, तर पोलीस खात्यामध्ये 15 वर्षे सेवा अभिलेख उत्तम ठेवल्याबद्दल वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील आणि हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक माणिक पवार यांचा सत्कार बावचे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर, हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कल्याण विधाते, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप गाडे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि हडपसर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रघुनाथ जाधव म्हणाले की, जन्मभूमी सोलापूर असली तरी, कर्मभूमी हडपसर आहे. हडपसर परिसरातील वाड्या-वस्त्याचा बदल जवळून पाहिला आहे. येथील राजकारणी, समाजकारणी आणि नागरिकही समजदार आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कामात त्यांनी कधी अडथळा आणला नाही, उलटपक्षी मदतच केली आहे. हडपसर परिसर मोठा आहे, तरीसुद्धा कामाचे नियोजन केले, तर कोणतीही गोष्ट कठीण नाही, अधिकारी आणि कर्मचारीवर्गाकडून चांगल्या पद्धतीने मदत होत असते, असे त्यांनी सांगितले.

हडपसर (गुन्हे) पोलीस निरीक्षक हमराज कुंभार म्हणाले की, रघुनाथ जाधव यांच्याबाबत सांगायचे तर ते रस्त्यावरचे अधिकारी आहेत. सतत गस्तीवर आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठबळ देण्याची त्यांची भावना आहे. त्यामुळे त्यांचा सेवापूर्ती समारंभसुद्धा माऊलींच्या विसाव्याच्या ठिकाणी तमाम जनतेने पाहिला आहे, ही बाब मोठे समाधान देऊन जात आहे. कितीही मोठी घटना झाली, तरी स्वतः सांभाळायचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना तुम्ही काळजी करू नका, मी सांभाळतो, ही त्यांची काम करण्याची पद्धती बरेच काही सांगून गेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.पोलीस हवालदार तानाजी देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.