चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍या ‘लॉ’च्या विद्यार्थीनीला अटक

शाहजहांपूर : वृत्तसंस्था – माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि भाजप नेता स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावणाऱ्या लॉच्या विद्यार्थिनीला एसआयटीने अटक केली आहे. पीडित विद्यार्थिनीवर चिन्मयानंदकडून खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याआधी विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर स्वामी चिन्मयानंद यांना तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. एसआयटीने मुलीला तिच्याच घरातून आज सकाळी अटक केली आहे. या प्रकरणी त्या विद्यार्थिनीच्या तीन मित्रांनाही अटक झाली आहे.

पीडित मुलीच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी होईल

पीडितेवर ही कारवाई तेव्हा करण्यात आली आहे जेव्हा पीडितेच्या अटकपूर्व  जामीनावर उद्या सुनावणी होणार आहे. विद्यार्थिनीने जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सोमवारी रात्री प्रयागराजमधून शाहजहांपूरमधील घरी आल्यानंतर विद्यार्थिनीच्या वकिलाने मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालायत तिच्या जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर अनेक तास सुनावणी सुरु राहिली.

मंगळवारी न्यायालयाची सुनावणी पूर्ण न झाल्याने विद्यार्थिनीची अटक टळली होती. विद्यार्थ्याला एडीजे (प्रथम) च्या कोर्टात हजर करण्यात आले होते. यानंतर ती एसआयटीच्या देखरेखीखाली होती. याआधी विद्यार्थिनी अटकेपासून वाचण्यासाठी रविवारी रात्री आपले वडिल आणि भाऊ यांच्यासोबत प्रयागराजला गेली होती.

उच्च न्यायालयाने योग्य न्यायालयात दाद मागण्यास सांगितले होते

विद्यार्थिनीच्या अटकेला स्थगिती देण्यासाठी सोमवारी हाय कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता. हायकोर्टाने या खटल्याची सुनावणी घेण्यास नकार दिला आणि योग्य न्यायालयात दाद मागण्यास सांगितले. सोमवारी रात्री उशिरा मुलगी वडिलांसोबत प्रयागराज येथून घरी परतली. तिथे शीख समाज सेवा समितीचे संयोजक गुरप्रकाश सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले, त्यात त्यांनी एसआयटीशिवाय इतर उच्चस्तरीय चौकशी समितीकडून चिन्मयानंद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Visit : policenama.com