वकिलाने महिला न्यायाधीशांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, 20 दिवसांपासून जेलमध्ये बंद
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वकिलाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे एक न्यायाधीश इतक्या नाराज झाल्या की, त्यांनी वकिलाविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली. यांनतर वकिलाला 20 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. हे प्रकरण रतलाम जिल्हा न्यायालयातील वकिलाचे आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी न्यायाधीशांना मेल केला, मात्र यामागे त्यांचा खराब हेतू नसल्याचे वकिलाने सांगितले. त्यांनी जामिनासाठी जेएमएफसी कोर्टापासून सेशन कोर्टापर्यंत धाव घेतली, परंतु दिलासा मात्र मिळाला नाही. अखेर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे.
माहितीनुसार, रतलाममध्ये तैनात असलेल्या महिला न्यायाधीशांचा जानेवारी महिन्यात वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वकिलांनी दुपारी एकच्या सुमारास न्यायाधीशांच्या अधिकृत मेलवर वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश पोस्ट केला. त्याने न्यायाधीशांच्या फेसबुक अकाउंटवरून त्यांचा फोटो डाऊनलोड करुन अभिवादन म्हणून न्यायाधीशांना पाठविला. मात्र, अश्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने न्यायाधीश मॅडम इतक्या नाराज झाल्या की, त्यांनी स्टेशन रोड रतलाम पोलिस ठाण्यात तक्रार केली. ज्यानंतर वकिलांविरुद्ध कारवाई करण्यात आली. फेब्रुवारी रोजी त्याला अटक केली गेली.
पोलिसांनी वकिलाविरोधात भादवीच्या कलम 420, 467, 468, 469 आणि आयटी कायद्याच्या कलम 67 आणि 41 अन्वये गुन्हा दाखल केला. सध्या तो तुरुंगात असून जामिनासाठी त्यांने सत्र न्यायाधीशांकडे कैफियत मांडली पण काहीच दिलासा मिळाला नाही. यांनतर तो उच्च न्यायालयात दाखल झाला. त्याने अॅडव्होकेट केके गुप्ता यांच्यामार्फत जामीन याचिका सादर केली असून ती प्रलंबित आहे.