लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्यात दिलजमाई ? पार्थ यांच्या अडचणीत वाढ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणातील कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे यांची आज भेट झाली. राज्यात भाजपा आणि शिवसेनेची युती झाली असून मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेना-भाजप-रिपाइं- रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, विद्यमान खासदार दोघांच्या भेटीत राजकीय खलबते झाली आहेत.

राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन यांच्या माध्यमातून पिंपळे गुरव येथील जगताप यांच्या ‘चंद्ररंग’ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. दोघांमध्ये बराच वेळ  चर्चा झाली आहे. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सांगितली जाते आहे. शहरातील या दोन्ही नेत्यांची भेट म्हणजे मावळ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठी राजकीय घडामोड आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात जगताप सहभागी झाले नव्हते. बारणे यांच्याबाबत भाजपमध्ये नाराजीचा सूर होता. त्यापार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात टोकाचे राजकीय मतभेद होते. जगताप राष्ट्रवादीत असताना बारणे काँग्रेसमध्ये होते. कालांतराने बारणे शिवसेनेत गेले. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा दोघे आमने-सामने आले होते. जगताप यांनी अपक्ष तर बारणे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी जगताप यांनी बारणे यांचा पराभव केला होता.

मावळ लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा दोघे समोरा-समोर आले होते. श्रीरंग बारणे यांनी शिवसेना-भाजप तर लक्ष्मण जगताप यांनी शेकाप-मनसेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविली होती. त्यात बारणे यांनी जगताप यांचा पराभव केला होता. गेली अनेक वर्षांपासून जगताप आणि बारणे यांच्यात राजकीय वैर होते. याचा अनुभव अनेकदा आलेला आहे. राज्यात युती झाली असताना मावळात लक्ष्मण जगताप आणि त्यांचे समर्थक काम करणार का अशी चर्चा असताना दोघांची भेट होणे आणि चर्चा होणे मोठी घडामोड आहे.

Loading...
You might also like