टँकर माफिया संपविण्यासाठी विहिरी आणि कूपनलिका ताब्यात घ्या, पाणी लोकांना उपलब्ध करून द्या

आमदार लक्ष्मण जगताप यांची महापालिका आयुक्तांना सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवडमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची काही टँकर माफियांकडून अक्षरशः लूट सुरू आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात असणाऱ्या विहिरी व कूपनलिकांच्या माध्यमातून मिळणारे पाणी नागरिकांना अवास्तव दराने विकून हे टँकर माफिया आपले उखळ पांढरे करत आहेत. या टँकर माफियांनी मांडलेल्या उच्छादांमुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. शहरातील सर्व विहिरी व कूपनलिका ताब्यात घेऊन त्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून दिल्यास पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येणे शक्य होईल. त्यामुळे या विहिरी व कूपनलिका जिल्हाधिकारी यांच्यामार्फत अधिग्रहण करण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले असले तरी शहरासाठी दहा वर्षांपूर्वी मंजूर पाणी आरक्षण आणि शहराची आजची लोकसंख्या यांमध्ये खूप मोठा फरक आहे. दहा वर्षांपूर्वी १७ लाख लोकसंख्येला मंजूर केलेल्या पाणी आरक्षणातून आज २७ लाख लोकसंख्येची तहान भागवत असताना प्रशासनाची निश्चितच दमछाक होत आहे. परिणामी शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

एवढ्या मोठ्या लोकसंख्येला समान पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी हातात हात घालून एकत्रितपणे सर्व पर्यायांचा विचार करणे गरजेचे आहे. अनधिकृत नळजोडांना आळा घालून पाणीचोरी रोखण्यासोबतच इतर पर्यायी स्त्रोतांमधून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देता येईल का? याचा विचार प्रशासनाने करावा. शहरातील पाणीटंचाई तीव्र होण्यापूर्वीच हा विचार होणे आवश्यक आहे.

शहराच्या वेगवेगळ्या भागात विहिरी व कूपनलिका खोदण्यात आलेल्या आहेत. त्यांची संख्या मोठी आहे. काही विहिरी व कूपनिलिका या सरकारी खर्चाने, तर काही नागरिकांनी स्वखर्चाने खोदलेल्या आहेत. या विहिरी व कूपनलिकांचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देता येणे शक्य आहे. त्यातून पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येणार आहे. प्रत्यक्षात या विहिरी व कूपनलिकांचे पाणी विकणारे टँकर माफिया शहरात उदयास आले आहेत. शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना अवास्तव दराने पाणी विकून टँकर माफिया आपले उखळ पांढरे करत आहेत. सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची पाण्याच्या नावाखाली एक प्रकारे लुटच सुरू आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. शहराची सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता महापालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

महापालिकेने या विहिरी व कूपनलिका ताब्यात घेऊन त्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. तसेच त्यांची लूटही थांबेल. त्याचप्रमाणे टँकर माफियांना देखील कायमचा आळा बसेल. शहरातील पाणीटंचाई तीव्र होण्यापूर्वीच महापालिकेने विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याबाबत ठोस पावले उचलावीत. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शहरातील सर्व विहिरी व कूपनलिकांचे महापालिकेने अधिग्रहण करावे. ऐन उन्हाळ्यात तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा तसेच शहरातील नागरिकांवर “ये रे माझ्या मागल्या” म्हणण्याची वेळ येऊ नये म्हणून “विहिरी आणि कूपनलिका ताब्यात घ्या, पाणी लोकांना उपलब्ध करून द्या”, हे घोषवाक्य घेऊनच महापालिकेने आतापासूनच पाण्याचे नियोजन करावे, अशी सचूना आमदार जगताप यांनी केली आहे.”

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like