शिरूर-रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीत कामगारांना लुटणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

शिक्रापुर : पंचताराकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या शिरुर तालुक्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत रात्रीच्या वेळेस कामगारांना मारहाण करून त्यांना लुटणारी टोळीतील प्रमुखाला, त्याच्या चार अल्पवयीन साथीदारांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून त्यांच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

या अटक केलेल्या आरोपींकडून चोरी केलेले दोन मोबाईल मोटर सायकल,व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विकास संजय रोडे(रा.करडे,ता.शिरूर, जि पुणे) याला अटक करण्यात आली आहे या आरोपीने तीन अल्पवयीन साथीदार यांच्या मदतीने हे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.तसेच आणखी एक गुन्ह्याची कबुली त्याने दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,दिनांक 20 फेब्रुवारी रोजीचे संध्याकाळी 7:30 वा सुमारास रांजणगाव एमआयडीसी तील कम्पनी मध्ये काम करणारा सेक्युरिटी गार्ड रामदास मंडलिक केदार(वय 21 वर्षे रा पाचंगेवस्ती, ढोकसांगवी) हे आय टी आय कॉलेज जवळून पायी कारेगाव कडे जात असताना अंधाराचा फायदा घेऊन चार अज्ञात चोरट्यांनी त्यांना लाकडी दांडके, लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल जबरीने चोरून पळून गेले होते.याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक करत असताना रांजणगाव एमआयडीसी मध्ये कामगारांना लुटणारी टोळी विकास संजय रोडे (रा करडे ता शिरूर जि पुणे) याची असून त्याचे सोबत 3 ते 4 अल्पवयीन चोरटे आहेत, अशी बातमी गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्या अनुषंगाने खातरजमा करून विकास संजय रोडे याला करडे गावातून तसेच त्याचे इतर चार अल्पवयीन साथीदार यांना कारेगाव, बाभूळसर खुर्द, करडे या गावातून चौकशीसाठी सोबत घेऊन, पोलीसांनी अधिक चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच दि 21 फेब्रुवारी रोजी रात्री 09:00 वा सुमारास रांजणगाव एमआयडीसी तील एसीबीआय चौक येथे कम्पनी कामगार रोहित बर्मा खवळे (रा कारेगाव ता शिरूर जि पुणे) हा पायी जात असताना त्याचा देखील विकास संजय रोडे व त्याचे इतर तीन अल्पवयीन साथीदार यांनी मोबाईल जबरीने हिसकावून नेला होता. सदरचा गुन्हा देखील त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले, त्याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करणेत आला आहे.

विकास संजय रोडे( रा करडे ता शिरूर जि पुणे)याने वेगवेगळे तीन अल्पवयीन साथीदार सोबत घेऊन दोन्ही गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून त्याचे कडून गुन्ह्यात चोरी केलेले दोन मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल हस्तगत करून आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास रांजणगाव चे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत करीत आहे.

सदरची कामगिरी ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर , पोलिस हवालदार उमाकांत कुंजीर,पोलिस हवालदार जनार्दन शेळके ,पोलिस नाइक मंगेश थिगळे, पोलिस नाईक अजित भुजबळ , पोलिस नाईक राजु मोमिन ,पो कॉ अक्षय नवले या पथकाने केली आहे.