मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १४ बॅटरी चोरीचे गुन्हे उघड केले आहेत.

इकबाल मनुलाल शेख, इम्तियाज कदीर शेख, सचिन दिलीप सपाटे (रा. कसबा पेठ) अशी तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात थेऊर गावातील जिओ कंपनीच्या मोबाइल टॉवरमधून ६ बॅटरी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरु होता. त्यावेळी पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार इक्बाल शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने इम्तियाज आणि सचिन यांच्याशी संगनमत करुन ग्रामीण भागातील मोबाइल टॉवरच्या बॅटरी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघांनाही अटक केली.

चोरट्यांकडून ४ बॅटरी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी भीमा-कोरेगाव, थेऊर, लोणीकंद, चिखली, ताथवडे, भवानी पेठ, निगडी, हडपसर, कुंजीरवाडी, तळवडे, खराडी, ताथवडे आणि सातारा जिल्ह्यातील लोणंद भागातील मोबाइल टॉवरच्या बॅटरी चोरल्याचे निष्पन्न झाले.

ही कारवाई पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like