…म्हणून भाजपचे ‘संकटमोचक’ महाजन संकटात !

जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी येत्या 18 मार्चला निवडणूक होणार आहे. पण त्यापूर्वीच सत्ताधारी भाजपचे 57 पैकी 25 नगरसेवक कुठे आहेत, याची माहिती अद्याप पक्षाला नाही. त्यामुळे माजी मंत्री आणि भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन आता अडचणीत आले आहेत.

भाजपचे विद्यमान महापौर सुनील खडके, माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह या 25 नगरसेवकांनी भाजपला राम राम करत शिवसेनेत प्रवेश करण्याची तयारी केली आहे, तर उर्वरित नगरसेवकांना गिरीश महाजन यांनी अज्ञातस्थळी नेले आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या पाठिंब्याच्या जोरावर आता जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची महापौरपदी निवड होणार असल्याचा अंदाज आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये, म्हणून भाजपने आपल्या नगरसेवकांसाठी व्हीप जारी केला आहे. तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे 25 पेक्षा जास्त नगरसेवक गायब झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर गिरीश महाजन यांनी 17 नगरसेवक संपर्काबाहेर असल्याचे कबुल केले.

25 नगरसेवक फुटले?

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे 25 नगरसेवक फुटल्याचे सांगितले, तर दुसरीकडे एमआयएमचे नगरसेवकही शिवसेनेसोबत आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.