काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब ?, लवकरच अधिकृत घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे.प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नेते राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांचीही नावे चर्चेत होती. मात्र या दोघांऐवजी नाना पटोले यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान पटोले यांचे नाव निश्चित झाल्याने विधानसभेचा नवा अध्यक्ष देखील बदलावा लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस संघटनेत बदल होणार असल्याची चर्चा सुरु होती. आता राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या दोन ते तीन दिवसात कधीही पटोले यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदीच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. पटोले यांच्या निवडीमुळे विधानसभा अध्यक्ष बदलाचा ही प्रश्न आहे. त्याबाबत काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतही चर्चा केल्याचेही सांगण्यात येत आहे.

राज्यात मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्ष अशी दुहेरी भूमिका सांभाळणाऱ्या बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची तयारी केली आहे. राज्यातील काँग्रेसला पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष मिळावे अशी चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरु होती, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्यापेक्षा स्वत:हून या पदातून मुक्त होण्याची तयारी थोरातांनी केली आहे. सध्या थोरात यांच्याकडे महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी आहे.प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची थोरात यांची भूमिका असली तरीही हायकमांड काय निर्णय घेत हे महत्त्वाचे आहे. थोरात यांना पक्षाची वाढ करत सरकार सांभाळण्याची दुहेरी भूमिका सांभाळावी लागत होती.