विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विखे पाटीलही आता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून  मिळाली आहे. राजीनाम्याबाबतचा निर्णय त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनाही फोनवरुन कळवल्याची माहिती आहे.

म्हणून विखे पाटील देणार राजीनामा ?  –

मुलाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसने साथ न दिल्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील अस्वस्थ आहेत. पुत्रप्रेमापोटी सुजयला साथ द्यायची तर काँग्रेससाठी अडचणीचे होईल आणि काँग्रेससोबत राहिलो तर मुलाला साथ दिली नाही असा संदेश जाईल अशा राजकीय कात्रीत राधाकृष्ण विखे-पाटील सापडले आहेत. त्यामुळे काँग्रेसला रामराम ठोकण्याचा विचारही राधाकृष्ण करत असल्याचे समजते. सध्या दिल्ली मुक्कामी असलेले विखे-पाटील याच काळात काँग्रेस पक्षश्रेष्टींकडे राजीनामा देऊन महाराष्ट्रात परतणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

सुजय  विखे-पाटील यांचा भाजपमध्ये  प्रवेश-

सुजय विखे हे गेल्या अनेक दिवसांपासून नगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात होते. वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असल्यानं आपल्याला सहज तिकीट मिळेल, असा त्यांचा अंदाज  होता. मात्र, आघाडीच्या जागावाटपात नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडं असल्यानं विखेंना तिकीट मिळवून देण्यासाठी काँग्रेसला अनेक तडजोडी कराव्या लागणार होत्या. राधाकृष्ण विखे यांनीही पुत्रासाठी पक्षाकडं तसा आग्रह धरला होता. मात्र राष्ट्रवादीकडून नगरची जागा देण्यास ठाम नकार देण्यात आला होता.

काँग्रेसकडूनही विशेष प्रतिसाद येत नसल्यानं दरम्यानच्या काळात सुजय यांची भाजपशी  बोलणी सुरू होती. या संधीचा फायदा भाजपने बरोबर उचलला. विखे यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध करणाऱ्या स्वपक्षीयांना तातडीनं शांत करण्यात आलं. त्यामुळं सुजय यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर झाला. त्यानंतर काल मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लब हाऊसमध्ये सुजय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

You might also like